मुंबई- २०२० प्रामुख्याने लॉकडाऊनने व्यापला होता. नवनवीन गोष्टी शिकतानाच फावल्या वेळात लेखकांना नवीन कल्पना सुचत होत्या व त्यात ‘लॉकडाऊन’ हा विषय नसला तर नवलच. ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाचा कथेचा जन्मही याच कालखंडातलाच. ही प्रेम-लग्नकथा घेऊन येताहेत लेखक, दिग्दर्शक सुमीत संघमित्रा. या नव्या चित्रपटाचा शुभारंभ नुकताच पुण्याच्या जागृत देवस्थानात म्हणजेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी केला.
निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक यांच्या ‘डॉक्टर डॉक्टर’ चित्रपटाच्या यशानंतर ते पुन्हा एकदा नव्या कोऱ्या आणि दमदार विषयाच्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. सह निर्माते आहेत हर्षवर्धन भरत गायकवाड तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित संघमित्रा करत असून चित्रपटात बऱ्याच दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे परंतु तूर्तास या चित्रपटातील कलाकार अजूनही गुलदस्त्यात आहेत.