आज रजनीकांत यांचा कोणताही पिक्चर रिलीज झाल्यावर चित्रपटगृहाबाहेर त्याचे मोठाले कटआऊट्स लावून रजनीकांतचे चाहते त्याला दुधाची आंघोळ घालतात. त्यांची देवासारखी पूजा करतात. याचप्रमाणे प्रत्येक शहरात त्याचे फॅन क्लब असून त्याच्या पिक्चरला फर्स्ट डे फर्स्ट शो हजेरी लावतात. यन्ना रास्कला म्हणत पडद्यावर एका वेळेस हजारो शत्रूंना चीतपट करणारा हा कलाकार आपल्या खऱ्या आयुष्यात तेवढाच साधा आणि सरळ आहे. एवढ्या प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचूनही त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत.
कर्नाटक येथील मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजी गायकवाड. लहानपणापासून त्यांना अभिनयाचे प्रचंड वेड होते. याच अभिनयाच्या वेडापायी त्यांनी चेन्नई येथील मद्रास फिल्म इंस्टीट्यूट येथून अभिनयाचा प्राथमिक कोर्स केला. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते.
कंडक्टर ते साऊथ सुपरस्टारपर्यंतचा प्रवास..
अभिनेता रजनीकांतचा कंडक्टर ते साऊथ सुपरस्टार बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय आणि रोमांचकारी आहे. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात नाटकांमधून झाली. कन्नड नाटकांमध्ये त्यानी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर ते तामिळ सिनेमांकडे वळले. यासाठी रजनीकांत यांना तामिळ भाषेचे धडे घ्यावे लागले. रजनीकांत यांना त्यांच्या ‘बिल्ला’ या सिनेमाने खरी ओळख दिली. त्यांचा हा सिनेमा प्रचंड गाजला. याच सिनेमावरुन नंतर बॉलिवूडमध्ये ‘डॉन’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. आजवर त्यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांची प्रत्येक भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण असते.
हेही वाचा -वाढदिवस विशेष : जेजुरीचा 'खंडोबा' आहे रजनीकांतचे कुलदैवत