नवी दिल्ली -अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'लक्ष्मी' हा भयपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. शनिवारी दोघांनी मिळून तृतीयपंथीयांसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. यावेळी चित्रपटाचे निर्माते तुषार कपूर आणि सबीना खान हे देखील उपस्थित होते. दिल्लीतील असफ अलीमार्गावरील 'डिलाईट सिनेमा' या चित्रपटगृहात हा विशेष कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यासह १५० तृतीयपंथी उपस्थित होते.
'लक्ष्मी' या भयपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. एका तृतीयपंथी व्यक्तीचा आत्मा अंगात घुसलेल्या व्यक्तीची भूमीका अक्षय करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय संवेदनशील विषयाला हात घातल्याबद्दल लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांचे आभार मानले आहेत. चित्रपटाचा ट्रेलरही पाहिला होता आणि आता चित्रपटही पाहिला. यामध्ये कुठेही तृतीयपंथी समाजाच्या भावना दुखावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मी या चित्रपटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे त्रिपाठी म्हणाल्या.