मुंबई - नामवंत चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने शुक्रवारी आगामी ‘दोस्ताना २’ या चित्रपटाचे कास्टिंग बदलले असल्याबद्दल निवेदन प्रसिध्द केले होते. या चित्रपटातून कार्तिक आर्यनला वगळण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले होते. तथापि, त्यांनी हा निर्णय का घेतला याबद्दलचा कोणताही खुलासा केलेला नाही.
कोणतेही नाव न घेता प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या कलाकार बदलीबाबतचे निवेदन जारी केले. "व्यावसायिक परिस्थितीमुळे, आम्ही सन्माननीय मौन बाळगण्याचा निर्णय घेतला आहे - आम्ही कोलिन डिकुन्हा दिग्दर्शित 'दोस्ताना 2' चित्रपटाच्या कालाकारांमध्ये बदलकरीत आहोत. कृपया लवकरच अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा करा,' असे धर्मा प्रॉडक्शनच्या निवेदनात म्हटले आहे.
धर्मा प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर कार्तिक आर्यनाला चित्रपटातून काढल्याचे निवेदन प्रसिध्द केल्यानंतर प्रॉडक्शन बाऊसवर नेटकऱ्यांनी तुफान हल्ला चढवला. धर्मा प्रॉडक्शन नेपोटिझ्म करीत असल्याचा आरोप करण्यात आला. काही जणांनी कार्तिक आर्यनची अवस्था नेपोटिझ्मचा बळी ठरलेल्या सुशांत सिंह राजपूतसारखी झाल्याची तुलना केली. कार्तिक हादेखील सुशांतसारखा फिल्म इंडस्ट्रीतील इनसायडर नाही. काही चाहत्यांनी 'दोस्ताना २' वर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही घेतला.
धर्मा प्रॉडक्शनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील कमेंट्स सेक्शन अक्षम केले गेले असले तरी नेटिझन्सनी जिथे हे निवेदन प्रसिध्द करण्यात आले होते अशा त्यांच्या अधिकृत फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर राग व्यक्त केला आहे.