मुंबई -अभिनेता किरण माने यांना काही दिवसांपूर्वी ‘मुलगी झाली’ हो’ या सुप्रसिद्ध मालिकेतून तडकाफडकी अपमानास्पदरित्या काढून टाकण्यात आले होते. राजकीय दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर निर्मात्यांनी किरण मानेंवर असभ्य व अश्लील वागणुकीचा ठपका ठेवला होता. काल (शुक्रवारी) किरण मानेंनी पत्रकार परिषद घेतली आणि सर्व आरोपांचे क्रमशः खंडन केले. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि निर्मात्यांना रु. ५ कोटी नुकसान भरपाईची मागणी करणारी नोटीस बजावल्याचे सांगितले.
‘मी पुरोगामी विचारांचा माणूस आहे. छत्रपती शिवराय, शाहू, फ़ुले, आंबेडकर, तुकोबा राया, ज्ञानेश्वर माउली यांच्या विचारांना फॉलो करतो. मी ते विचार सोशल मीडियावर मांडत असतो, अगदी तुकारामाचे विद्रोही अभंग सुद्धा. ज्या अभंगामुळे एका विशिष्ट विचारधारेच्या माणसांनी त्यांना त्रास दिला ते अभंग मी पोस्ट करीत असतो. ज्या विचारधारेनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार त्याबद्दल मी व्यक्त होत असतो. परंतु जे मी बोलतो ते बऱ्याच जणांना रुचत नाही. माझी ही विचारधारा बऱ्याच जणांना मान्य नाही. मी कधीही कुणाला किंवा कशावरही अश्लील अथवा अर्वाच्य भाषेत टीका करीत नाही. प्रत्येक माणसाकडे एक राजकीय भूमिका असते तशी माझीही आहे. आणि ती असावी आणि आपली मतं मांडण्याचा अधिकार जोपासावा. संविधानानं मला सत्ताधाऱ्यांवरदेखील टीका करण्याचा अधिकार दिलाय’, असे किरण माने यांनी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत संवाद साधताना सांगितले होते.
महिला सहकलाकारांचा किरण मानेंवर आरोप
'मुलगी झाली हो' या मराठी मालिकेत विलास पाटील यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते किरण माने यांना काढून टाकल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आहे. त्यांना मालिकेतून हटवल्यानंतर अनेक सहकलाकार आणि काही संस्था त्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या. तसेच अनेक लोकांकडून कठोर टीका देखील करण्यात आली होती. तसेच काही महिला सहकलाकारांनी त्यांच्यावर असभ्य वर्तन आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप देखील केला होता. मात्र, किरण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले.
माझा मानसिक छळ केला
लैंगिक छळासह अनेक आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मानेंनी पत्रकार परिषद घेतली होती. पॅनोरमा एंटरटेनमेंटने आपल्याला अन्यायकारक पद्धतीने काढून टाकल्याचे किरणने सांगितले. ‘या निर्णयामुळे माझा मानसिक छळ करण्यात आला आहे. माझ्यावर महिलांचा लैंगिक छळ केल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे माझ्या कुटुंबाला आणि करिअरला मोठा फटका बसला आहे. हेतुतः माझी प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत’, असे किरण माने यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत किरणचे वकील असीम सरोदेही उपस्थित होते. असीमने किरणच्या खटल्यातील कायदेशीर बाबी सांगितल्या. तसेच किरणने प्रॉडक्शन हाऊसला कायदेशीर नोटीस बजावून ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.