मुंबई - इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा आगामी सिनेमा - 'खाली पिली' च्या निर्मात्यांनी सोमवारी या चित्रपटाचा अॅक्शन-पॅक टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.
या टिझरची सुरूवात पोलिसांच्या वॉकी टॉकीवरील संदेशाने होते. एका मुलाने मुलीला काली पिली टॅक्सीतून पळवल्याचा हा संदेश आहे. या टॅक्सीचा नंबर आहे ६९६९.
सुमारे दीड मिनिटांच्या टिझरमध्ये इशान आणि अनन्या टॅक्सीतून पळून जाताना दिसतात. त्यांच्याकडे रोख रक्कम आणि दागिने आहेत. टिझरमध्ये इशान हा हाफ मर्डर केलेला दिसत असून अनन्या ही डान्सर आहे.
हे दोघेजण का पळून चाललेत हे दाखवले नसले तरी यातून मार्ग कसा काढायचा यावर ते दोघे चर्चा करताना दिसतात. त्यांच्या चर्चेत इशान म्हणतो, पहिला प्लॅन आहे, सचिन तेंडूलकरच्या स्टाईलने चौकार मारुन गोलंदाजाला धक्का द्यायचा...हे न पटल्याने अनन्या म्हणते दुसरा प्लॅन काय आहे...तो म्हणतो विरेंद्र सेहवागप्रमाणे हाणायचे, जे होईल ते होईल. यावर ती तिसरा प्लॅन आहे का असे विचारते...राहूल द्रविड टाईपचा..सेफ.
हेही वाचा -अमिताभ यांनी सुरू केले 'कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग
मकबूल खान यांनी दिग्दर्शित केलेला खाली पिली हा चित्रपट निर्माता अली अब्बास जफर, हिमांशू मेहरा आणि झी स्टुडिओ यांची संयुक्त निर्मिती आहे. या चित्रपटात 'पाताल लोक' अभिनेता जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 'खाली पिली' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. १२ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन होते. मात्र थिएटर्स बंद असल्यामुळे हे घडू शकले नव्हते. अद्यापही याच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केलेली नाही.