२०१३ मध्ये प्रदर्शित आत्यंतिक राष्ट्रवादावर (न्यू इंडियाचे चित्र दाखवणारा) आधारित निखिल अडवाणीने दिग्दर्शीत केलेला डी-डे हा चित्रपट आला होता. खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटात ऋषी कपूर यांनी दाऊद इब्राहिमवर आधारित गोल्डमॅन ही भूमिका साकारली होती. तर इरफान खानने 'वाली' या रॉ एजंटची भूमिका केली होती. या चित्रपटात एक संवाद असून ऋषी कपूर इरफानला विचारतो, की जग त्यांचे काय म्हणून स्मरण करेल? एका दिवसाच्या अंतराने जेंव्हा या दोघांनी जगाचा निरोप घेतला त्यावेळी - अभिनयाची स्वतंत्र शैली सांभाळून त्यात सर्वोच्च स्थानी असलेल्या आणि अभिनयात सातत्याने चढती कमान राहिलेले दोन कसदार अभिनेते म्हणून जगाने त्यांचे एकत्रित स्मरण केले आणि करत राहील.
दोघांचे जीवन खूप वेगळे होते. भारतीय सिनेसृष्टीतील पहिली फॅमिली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नायक म्हणजे ऋषी कपूर (६७). अति मद्यपान आणि असुरक्षितता वगळता इतर कशाचा संघर्ष करावा लागला नाही. दुसरीकडे राजस्थानमधील टोंक येथील एका छोट्या राजघराण्यातील साहिबजादा/राजपुत्र असलेला इरफान (५३) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील शिक्षण पूर्ण करून मुंबईत आला. मात्र चित्रपटसृष्टीत पाय रोवण्यास त्याला खूप वर्षे लागली. एक अतिशय उत्स्फूर्त आणि हजरजबाबी तर दुसरा प्रशिक्षित आणि तत्वज्ञान सांगणारा. एकाच्या रक्तातच अभिनय. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांच्या श्री 420 चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार’ या गाण्यात कॅमेर्याचा सामना केला. तर दुसऱ्याचा जन्म एका टायरचा व्यवसाय असलेल्या कुटुंबात झाला. एअरकंडिशनर दुरुस्तीसाठी म्हणून त्याने पहिल्यांदा मुंबईत पहिली.
तरीही या दोघांमध्ये बरेच काही साम्य होते. कलाकृतीबद्दल असलेली आत्मीयता. पोकळपणाची तिडीक. दिखाऊगिरी किंवा फालतू गोष्टींसाठी दोघांकडेही वेळ नव्हता. ऋषी कपूर यांनी ते अधिक जोरकसपणे मांडले. तुलनेने सौम्य असलेला इरफान मात्र शांत राहिला. जाताना मात्र पाठीमागे प्रेक्षकांना आवडेल अशा सिनेमांचा वारसा दोघांनीही सोडला आहे.
मीरा नायर यांच्या १९८८ साली आलेल्या सलाम बॉम्बेसाठी इरफानने एक वर्कशॉप केला होता. मात्र चित्रपटात आवश्यक असलेल्या कलाकारांसमोर तो खूपच प्रगल्भ, प्रौढ वाटला. चित्रपटाचे सहलेखक सोनी तारापोरवाला सांगतात की चित्रपटाची छायाचित्रण दिग्दर्शिका मुंबईला आली तेंव्हा तिला मुलाच्या रोलसाठी इरफान खूपच वयस्क वाटला. दुर्दैवाने नायर यांचा देखील नाईलाज झाला. शेवटी त्याच्या वाट्याला रस्त्याच्या कडेला बसलेल्या लेखकाची किरकोळ भूमिका आली.
दुसरीकडे ऋषी कपूर मात्र चिरतरुण. राज कपूरच्या 'मेरा नाम जोकर'मध्ये (१९७०) शिक्षिकेच्या प्रेमात पडलेला ते १९७३ साली आलेल्या बॉबीमध्ये अत्याधुनिक सूट-बूट घालून किशोरवयीन प्रेमींची भूमिका. १९७० च्या दशकातील बर्याच मुलांसाठी, बॉबीने मैत्री आणि लैंगिक संबंध म्हणजे काय ते शिकविले. टॉपला हटक्या पद्धतीची गाठ कशी मारायची आणि लेदर जॅकेट कसे घालावे ते शिकविले. धर्म, जातपात याची पर्वा न करता प्रेम करण्यास शिकवले. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात हलक्या फुलक्या रोमँटिक चित्रपटांमध्ये अभिनेत्याची भूमिका साकारलेला ऋषी कपूर जसा वयाने मोठा होत गेला तसा चरित्र अशा वास्तववादी चित्रपटांकडे वळला. २०१० मध्ये आलेल्या दो दूनी चारमध्ये त्याने जितक्या सहजतेने एक सामान्य मध्यमवर्गीय शिक्षक साकारला तितक्याच सहजतेने आणि ताकदीने २०१७ मधील मुल्कमध्ये दहशतवादाचा आरोप असलेल्या मुस्लिम व्यक्तीची भूमिका साकारली.
ट्विटरवर नशेत ट्विट करणारा, कोणताही आडपडदा न ठेवता मनापासून बोलणारा, खुल्लम खुल्ला या आत्मचरित्राच्या नावानुसार बीफ खाण्याबद्दल ते पाकिस्तानसोबत शांती हवी म्हणणारा ऋषी कपूर हा बॉलिवूडमधील एक स्पष्टवक्ता अभिनेता होता. कुर्बानी म्हणजे बकऱ्यांची कत्तल नव्हे असे स्पष्टपणे बोलणारा आणि मुस्लिम धर्मगुरूंनी आक्षेप घेतल्यावरही आपल्या वक्तव्यावर ठाम असणारा इरफान देखील तेवढाच दमदार होता. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये जसे त्याचे काम वाढत गेले तसे प्रौढ व्यक्तिमत्व रंगवण्याची साखळीच जणू सुरु झाली. द नेमसेक (२०१०) मधील अशोक गांगुली, इन ट्रीटमेंटमधील (२०१०) बेफिकीर गणिताचा शिक्षक, लाइफ ऑफ पाय (२०१२) मधील पाय पटेल किंवा २०१३ मध्ये आलेल्या द लंचबॉक्स मधील साजन फर्नांडिस. जुरासिक वर्ल्ड (२०१५)) आणि इन्फर्नो (२०१६) या ब्लॉकबस्टर हॉलीवूड चित्रपटांमध्ये जरी साचेबद्ध खलनायकाची भूमिका केली तरी चित्रपटांमध्ये एक वेगळीच चमक आणून त्याने चित्रपटांना एका उंचीवर पोचविले.