मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन सध्या यशाची शिखरे गाठत आहे. 'प्यार का पंचनामा' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने वेगवेगळ्या भूमिका साकारत आपला स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केलाय. परंतु त्याचा इथपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. याचा खुलासा त्याने आपल्या सोशल मीडियावरील ब्लॉगमध्ये केला आहे. त्याने उमेदीच्या काळात स्टुडिओच्या बाहेर कशा खेपा मारल्या होत्या याचा खुलासा त्याने यात केलाय.
आपल्या सुरूवातीचा संघर्षकाळ सांगताना तो लिहितो, ''माझा जन्म ग्वाल्हेरच्या छोट्या शहरात झाला होता. आई वडील वैद्यकिय क्षेत्रात होते आणि मला इंजिनिअर व्हायचे होते. पण नववीत असताना मी 'बाजीगर' चित्रपट पाहिला आणि माझे मन बदलले. १२ वी पर्यंत ग्वालियरमध्ये शिकायचे आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईला जायचे मी ठरवले, पण यावर आई वडिल कोणती प्रतिक्रिया देतील हे माहिती नव्हते. सुदैवाने माझे मुंबईत अॅडमिशन झाले आणि होस्टेलमध्ये राहायला सुरूवात केली. माझ्याकडे अभिनयाशी संबंधीत कोणताच संपर्क नव्हता, त्यामुळे मी फेसबुकवर 'कलाकार पाहिजेत' या कीवर्ड्सने सर्च करीत असे.''
कार्तिक पुढे लिहितो, ''मी ऑडिशनसाठी आठवड्यातून तीन चार दिवस ६-६ तास प्रवास करीत असे. स्टुडिओच्या बाहेरच मी रिजेक्ट होत असे. कारण मी तसा दिसत नव्हतो. तरीही मला अपेक्षा होत्या. लवकरच मला काही सेकंदाच्या जाहीराती मिळू लागल्या. त्या संधीचा लाभ घेत मी अंधेरीत १२ लोकांसोबत एक फ्लॅटमध्ये राहायला गेलो. माझ्याकडे पैसे अपुरे असल्यामुळे मी फोटोशूटही करु शकत नव्हतो. त्यामुळे मी ग्रुपफोटोमधील माझा फोटो क्रॉप करुन एजंटना पाठवायचो. अनेकवेळा ऑडिशनसाठी मी कॉलेजलाही दांडी मारायचो. माझ्या आई-वडिलांना याबद्दल काही माहिती नव्हते. एकदा मी सिनेमाच्या ऑडिशनची जाहिरात वाचली आणि तिथे जायचे ठरवले.'
आपल्या खडतर काळाबद्दल बोलताना कार्तिक पुढे लिहितो, ''त्यांना मी आवडलो आणि त्यांनी माझ्या बऱ्याच ऑडिशन्स घेतल्या. जेव्हा मला भूमिका मिळाली तेव्हा मी ही गोष्ट आईला कळवली, पण त्यांचा बल्कुल विश्वास बसत नव्हता. अडीच वर्षाच्या संघर्षानंतर स्वप्न साकारत होते. 'प्यार का पंचनामा'नंतर माझ्याकडे जास्त संधी नव्हती. मी डिग्री पूर्ण करावी, असे आईला वाटत होते. मी परिक्षा दिली आणि हॉलमधील लोकांनी माझे फोटो काढायला सुरूवात केली. 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमानंतर हे चित्र पूर्ण बदलले. मी जेव्हा ग्वालियरला गेलो तेव्हा मला शाळेमध्ये प्रमुख पाहुणा म्हणन बोलवले होते आणि मुले माझ्या नावाचा जयघोष करीत होते. पण आज जे माझ्याकडे आहे ते तेव्हा कधीच नव्हते. मी या काळातील आहे याचा मला अभिमान वाटतो.''