मुंबई- दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाची दाक्षिणात्य तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वीच विजयच्या 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला 'कबीर सिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यात शाहिद कपूरनं मुख्य भूमिका साकारली आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
यानंतर आता विजय देवरकोंडाच्या आणखी एका चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार आहे. करण जोहरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विजय देवरकोंडासोबतचा आपला फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये करणने चित्रपटाच्या रिमेकबद्दलची घोषणा केली आहे. 'डिअर कॉम्रेड' चित्रपट पहिल्यांदाच पाहायला मिळणं माझ्यासाठी आनंदाचं होतं. ही एक सुंदर आणि प्रखर प्रेमकथा आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदना यांचे अभिनय अतिशय उत्तम आहेत, असं करणनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.