मुंबई - बॉलिवूडमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख असलेला बहुगुणी दिग्दर्शक करण जोहर ५ वर्षानंतर दिग्दर्शनसाठी पुन्हा उतरणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने एक प्रेमकथा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या नव्या चित्रपटाची घोषणा तो उद्या मंगळवार दिनांक ६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता करणार आहे.
करण जोहरने नव्या चित्रपटाची घोषणा करीत असल्याचे सोशल मीडियावर कळवले आहे. त्याने एक व्हिडिओ जारी केला असून आपल्या आवडत्या दिग्दर्शनाच्या कामाकडे पुन्हा वळत असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केला आहे.
त्यांनी लिहिलंय की, ''करण जोहर आपल्या नव्या सिनेमाची घोषणा उद्या ११ वाजता करणार आहे..५ वर्षानंतर दिग्दर्शक म्हणून परतत आहे.''
करण जोहरची थोडक्यात ओळख
करण जोहर हा एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी काही दिग्दर्शित केल्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.