मुंबई -अनुपम खेर आणि मिथुन यांच्या भूमिका असलेल्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून वाद वाढत आहे. या वादाची झळ बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर टॉप कॉमेडियन कपिल शर्माही या वादातून सुटू शकलेला नाही. कपिल शर्माने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याचा आरोप दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने केला होता. कारण त्यात मोठे स्टार नाहीत. त्यानंतर कपिल विरोधात संतापाची लाट निर्माण झाली होती. परंतु ही फक्त एकतर्फी बाजू असल्याचे कपिलने म्हटले होते.
विवेक अग्निहोत्रीच्या विधानावर अनुपम खेर यांनी खुलासा केला की, कपिल शर्माकडून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमंत्रण आले होते. याबाबत त्यांचा मॅनेजरला कपिलने फोन केला होता. मात्र या चित्रपटाचा आशय गंभीर असल्याने कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये न जण्याचा निर्णय घेतल्याचे अनुपम खेर म्हणाले. खेर यांच्या या खुलाशाने कपिल शर्माचा जीव भांड्यात पडला आहे. 'द काश्मीर फाइल्स'मध्ये दाखवण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराबद्दल लोकांची सहानुभूती आणि 'द कपिल शर्मा शो'वर लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत आहेत.