मुंबई - बॉलिवूड कलाविश्वात कोरोनाची पहिली लागण होणारी सेलेब्रिटी म्हणजेच गायिका कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच कोरोनातून मुक्त झाली आहे. लंडनवरुन ती भारतात परतल्यानंतर तिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह निघाली होती. त्यानंतर तिच्यावर लखनऊ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. एकापाठोपाठ एक अशा ५ टेस्ट पॉझिटिव्ह निघाल्यानंतर कनिकाची चिंता वाढली होती. मात्र, अखेर तिची ६ वी टेस्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने तिच्यासह तिच्या कुटुंबीयानेही सुटकेचा निश्वास सोडला. आता कोरोनामुक्त झालेली कनिका नेमकी काय करत आहे, ती तिचा वेळ कसा घालवत आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
कोरोनामुक्त झालेली कनिका कपूर सध्या काय करतेय? - kanika kapoor latest news
कनिकाने रविवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
सध्या कनिका तिचा संपूर्ण वेळ लखनऊ येथे तिच्या कुटुंबीयासोबत घालवत आहे. रविवारी तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये ती तिच्या बालकनीमध्ये चहा पिताना दिसते. आपणा सर्वांना या चहाप्रमाणेच चेहऱ्यावर हास्य, प्रसन्न उर्जेची गरज आहे, असे तिने या पोस्टमध्ये लिहले आहे.
कनिकाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आले होते. तिने लंडनवरुन परतल्यानंतर काही पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. आयसोलेशनमध्ये न राहता तिने निष्काळजीपणे पार्ट्यांमध्ये हजेरी लावल्याने तिच्या संपर्कात येणाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे तिच्यावर बरीच टीका झाली. या प्रकरणाबाबत कनिकाने स्पष्टीकरण दिले की ती कोणत्याही पार्ट्यांना हजर नव्हती. तिच्याविषयी चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे. लखनऊमध्ये मी कोणत्याही पार्टीमध्ये सहभाग घेतला नव्हता, असे तिने सांगितले आहे.