मुंबई - दीपिका पदुकोणच्या 'छपाक' चित्रपटातील पहिला लूक अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती अॅसीड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांची भूमिका साकारत आहे. दीपिकाच्या लूकवर कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. रंगोलीलादेखील अॅसीड हल्ल्याला सामोरे जावे लागले होते.
'छपाक'च्या पहिल्या लूकमध्ये समोर आलेल्या दीपिकाच्या लूकने चाहत्यांसह बॉलिवूडच्या कलकारांनाही थक्क केले आहे. अनेक कलाकारांनी दीपिकाच्या या लूकचे कौतुक केले आहे. यामध्ये रंगोलीनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने दीपिकाच्या या लूकची प्रशंसा करत ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तिने लिहिलेय, की 'या जगात कितीही भेदभाव आणि अन्याय असला, तरीही आपण ज्याचा तिरस्कार करतो, त्याला त्याच्याचप्रमाणे उत्तर देऊ नये. दीपिका पदुकोण आणि मेघना गुलजार यांचे काम प्रशंसनीय असेच आहे. मी देखील अॅसीड हल्ल्याला सामोरी गेली आहे. त्यामुळे माझा या चित्रपटाला पाठिंबा आहे'.
रंगोलीवर २००६ मध्ये अॅसीड हल्ला झाला होता. त्यावेळी ती सुक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करत होती. एका भाड्याच्या घरात राहत असताना एका व्यक्तीने डिलीव्हरी बॉय म्हणून तिच्या घरात प्रवेश केला होता. रंगोलीने दार उघडताच तिच्यावर त्याने अॅसिड फेकले होते.एका माध्यमाच्या मुलाखतीत कंगनाने देखील याबाबत माहिती दिली होती. या हल्ल्यानंतर रंगोलीवर जवळपास ५७ शस्त्रक्रिया झाल्या होत्या.
'छपाक' चित्रपटाच्या निमित्ताने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला प्रदर्शित होईल.