मुंबई - कंगना रनौतने मुंबई पोलिसांची भीती वाटते, असे म्हणत मुंबई पाकव्याप्त काश्मीर असल्यासारखे वाटते असे म्हणून नवा वाद ओढवून घेतला आहे. दरम्यान, कंगना रनौतने मुंबईला परतत असल्याची घोषणा केली आहे. कुणाच्या दम असेल तर थांबवून दाखवा, असे थेट आव्हानच तिने दिले आहे. या वादाचा घटनाक्रम थोडक्यात पाहूयात....
कंगना सातत्याने बॉलिवूडमधील प्रस्थापित प्रॉडक्शन हाऊसना माफिया म्हणत आली आहे. तसेच इथे ड्रग माफियादेखील तितकेच घातक आहेत, असे कंगना उघडपणे बोलत होती. यावर भाजप नेते राम कदम यांनी कंगनाला संरक्षण द्या, असे ट्विट केले होते. ''कंगना रनौत ही बॉलिवूड ड्रग माफियांचा पर्दापाश करु शकते. मात्र तिला संरक्षण देण्याची गरज आहे. दुर्दैवाने अजूनही महाराष्ट्र सरकारने तिला पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे.'' असे ट्विट राम कदम यांनी केले होते.
यानंतर राम कदम यांच्या ट्विटला कंगनाने उत्तर दिले होते. “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय. हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी, पण मुंबई पोलीस नको', असे कंगना म्हणाली होती.
कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपले चंबू गबाळ आवरून आपल्या राज्यात परत जावे. हा काय तमाशा चाललंय', असे ते म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे, मग ते कोणी असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी दिलेल्या उत्तरानंतर कंगनाने पुन्हा एक ट्विट करत मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे? असे म्हटेल आहे. तिने ट्विट केले, ' आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?', असा प्रश्न कंगनाने आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
कंगनाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका भाजपने घेतल्याचे दिसते, मुंबई भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी कंगनाची बाजू घेत महाराष्ट्र सकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. "सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या बड्या नेत्याने पुन्हा एकदा कंगना रनौतला धमकावण्याचे दुःसाहस केलंय. की कंगनानं मुंबईत येऊ नये..का कंगनानं मुंबईत येऊ नये? कंगनाच्या मुंबईत येण्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारला इतकी भीती वाटण्याचे कारण काय?", असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.
राम कदम यांच्या या टीकेला काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी प्रत्यूत्तर देत ट्विटवर आपली भूमिका मांडली आहे.
'कंगना टीम' म्हणजेच कंगना रनौत आणि भाजप आयटी सेल असे समीकरण आहे. तिच्या ट्विट्स आणि वक्तव्यांचा खरा सूत्रधार भाजप आहे. या कृतघ्न महिलेसोबत मिळून राम कदमांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा अपमान केला आहे; अशी बोचरी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत यांनी ट्विटरचा आधार घेत कंगना आणि भाजपवर निशाणा साधला. "महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना आणि राम कदमांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे." असे ट्विट त्यांनी केले.
सुशांतसिंह प्रकरणात समोर आलेल्या विवेक मोईत्रा याचे राम कदमांशीही संबंध होते. कदमांचे बॉलिवूडमध्येही घनिष्ठ संबंध आहेत. तसेच, मोईत्रा याने राम कदमांना ड्र्ग्स पुरवठा केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे, राम कदमांची नार्को टेस्ट केली जावी अशी मागणी सचिन सावंत यांनी यावेळी केली आहे. सुशांतसिंह प्रकरणातीलच संदिप सिंग याने भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन करुन कोणाशी, कशाबाबत चर्चा केली याबाबतही तपास केला जावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
कंगनाच्या ट्विटनंतर बॉलिवूडमध्ये अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी तर कंगनाला चांगलंच खडसावलं आहे. महाराष्ट्र हा संपूर्ण देशाचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा असून ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी असल्याचे ट्वीट उर्मिलाने केलं आहे. हे सर्व शॉकिंग असल्याचं तिने म्हटलंय. मुंबईने कोट्यवधी भारतीयांना स्वत:ची ओळख दिली आहे. केवळ कृतघ्न लोक याची तुलना पीओकेशी करू शकतात, असे उर्मिलाने म्हटले.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियावर कंगनाच्या ट्वीटला उत्तर देताना लिहिले की, 'मुंबई हे ते शहर आहे जिथे तुझे बॉलीवूड स्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले! अशा परिस्थितीत, या आश्चर्यकारक शहराबद्दल कोणीही तुझ्याकडून नक्कीच काही आदराची अपेक्षा करेल. तू मुंबईची तुलना पीओकेशी कशी केली याबद्दल खूप वाईट वाटते.
यानंतर रेणुका शहाणे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देऊन कंगनानेही प्रत्युत्तर दिले. कंगनाने लिहिले, 'प्रिय रेणुका जी, एखाद्या जागी असलेल्या प्रशासनावर टीका करणे त्या शहरावर टीका करण्यासारखे कधीपासून झाले. रक्ताच्या तहानलेल्या गिधाडांसारख्या माझ्या देहाचा तुकडा शोधण्याच्या प्रतिक्षेत तुम्हीही आहात काय? मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. '
एकंदरीतच कंगना तिच्या पध्दतीने आक्रमक होऊन वाद ओढवून घेत आहे. मुंबईवर प्रेम करणाऱया अनेकांना कंगनाचे हे वागणे योग्य वाटत नाही. सध्या सोशल मीडियावर # मुंबई मेरी जान हा हॅशटॅग ट्रेंड करीत होता. यामध्ये रितेश देशमुखपासून अनेक हिंदी मराठी कलावंतांनी कंगनाच्या भूमिकेला उघड विरोध केला आहे. मनसेची चित्रपट सेनाही कंगनाच्या विरोधात आक्रमक झाली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्रातील भाजप सोडून इतर पक्षांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. इतकेच नाही तर तिच्यासोबत करणी सेना कालपर्यंत होती असे वाटत असताना मुंबई करणी सेनेनेही कंगनाच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
दरम्यान कंगना रनौतने मुंबईला परतत असल्याची घोषणा केली आहे. कुणच्या बापाच्यात दम असेल तर थांबवून दाखवा असे थेट आव्हानच तिने दिलंय. तिने ट्विटरवर लिहिलंय, ''बरेच लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देत आहेत म्हणून मी आता येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा मी वेळ पोस्ट करते. किसी के बाप में हिम्मत है तो रोक ले.''
सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआय करीत असताना सुशांतला न्याय मिळावा यासाठीच्या मोहिमेचे कंगना जणू नेतृत्वच करीत आहे. कंगना सध्या शिमला येथे राहात असून तिथूनच सोशल मीडियावरुन या वादात तेल ओतत आहे. येत्या ९ सप्टेबरला कंगना मुंबईत परतणार आहे. तिचे मुंबईत कोण स्वागत करणार आणि कोणता नवा वाद तयार होणार याची प्रतीक्षा करावी लागेल.