मुंबई- बॉलिवूड ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या आगामी चित्रपटांवर जास्त लक्ष देत आहे. लवकरच ती 'पंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात कंगना एका राष्ट्रीय कबड्डीपटूची भूमिका साकारत असून चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
९ एप्रिलला दिल्लीत चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरण पूर्ण झाले. तर आता पश्चिम बंगालमध्ये चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटींग होणार आहे. बंगालमधील प्रिन्सेप घाट येथे ती दिग्दर्शक अश्विनी तिवारीसह स्पॉट झाली. कंगनाने चित्रीकरणाला सुरुवात केली असून चित्रपटात तिच्या पतीची भूमिका साकारणारा पंजाबी अभिनेता जेसी गिल १४ तारखेपासून चित्रीकरणाला सुरुवात करेल.
शहरातील अनेक प्रसिद्ध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल. कंगनाशिवाय इतरही अनेक कलाकार चित्रपटात झळकणार असून ते यासाठी कबड्डीचं प्रशिक्षण घेत असल्याचं म्हटलं जात आहे. २०२० मध्ये २४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.