मुंबई- अभिनेत्री कंगना रणौत मुंबईत पोहोचली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ती दुसऱ्यांदा मुंबईत येत आहे. ती मनालीमधील आपल्या घरीच राहात होती. याच काळात १४ जूनला सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण घडले आणि मनालीतील आपल्या घरातून कंगना ट्विटरवरुन वादळ निर्माण करीत राहिली. याच्या परिणामी तिने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्याशीही पंगा घेतला होता.
मुंबईला पीओके म्हणणे आणि उध्दव ठाकरेंना एकेरी बोलवणे तिला महागात पडले. तिच्यावर काही केसेसही दाखल झाल्या असून तिच्या कार्यालयावर बीएमसीचा हातोडा चालवण्यात आला होता. ती जेव्हा मनालीहून मुंबईत दाखल होणार होती तेव्हा केंद्र सरकारने तिच्यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. त्याच दिवशी हा हातोडा चालवण्यात आला आणि बरेच दिवस ती चर्चेच्या केंद्र स्थानी राहिली. खरंतर न्यायालयाने बीएमसीला केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. कंगनाला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही बीएमसीला देण्यात आले आहेत.