शिमला : कंगना रणौतचा कोरोना अहवाल मंगळवारी रात्री उशीराने प्राप्त झाला. यामध्ये ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे समजले आहे. त्यामुळे आज तिचे महाराष्ट्रात येणे निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.
मंगळवारी मनालीमध्ये चाचणीसाठी जमा केलेला कंगनाचा नमुना फेल गेल्यामुळे मंडीमध्ये पुन्हा तिने कोरोना चाचणी दिली होती. या चाचणीचा अहवाल रात्रीपर्यंत मिळाला नव्हता. त्यामुळे आज तिला मुंबईला येता येईल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र रात्री उशीरा तिचा अहवाल प्राप्त झाला, आणि तो निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मंडीचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र शर्मा यांनी कोरोना अहवालाबाबत माहिती दिली.
दरम्यान कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कंगना रणौत मंडीहून चंदीगड विमानतळाकडे रवाना झाली आहे. तेथून विमानाने ती आज मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.