मुंबई- अभिनेता कंगना रणौतसाठी जगातील सर्वात सुंदर आणि सुखकारक स्थान कोणते असेल तर, तो आहे चित्रपटाच्या शूटिंगचा सेट. ती पुन्हा एकदा चित्रपटाच्या सेटवर रुजू झाली आहे. थलायवी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
"गुड मॉर्निंग मित्रांनो, माझे प्रिय दिग्दर्शक ए.एल. विजय जी यांच्या काल पहाटेच्या सीन्समधील काही फोटो आहेत. जगात अद्भूत अशा अनेक जागा आहेत. परंतु माझ्यासाठी सर्वात आरामदायी आणि सुखकारक जागा आहे फिल्म सेट'', असे कंगनाने म्हटले आहे. तिने थलायवी चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या चित्रपटामध्ये कंगना तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. साडी परिधान केलेली कंगना एका फोटोत दिग्दर्शक विजय यांच्याशी चर्चा करीत असल्याचे दिसते. कंगनाने सात महिन्यांनंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात केली आहे. आपण दक्षिण भारताच्या दौऱ्यावर शूटिंगसाठी जात असल्याचे गेल्या आठवड्यात चाहत्यांना कळवले होते. त्यानुसार तिने शूटिंगला सुरुवात केली आहे.
थलायवी हा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री जे. जयललिता यांचा चरित्रपट आहे. याचे दिग्दर्शन ए. एल. विजय करीत आहेत. या चित्रपटाचे लेखन बाहुबली आणि मणिकर्णिका लिहिलेल्या के. व्ही विजयेन्द्र प्रसाद आणि रजत अरोरा यांनी केले आहे.
थलायवी हा चित्रपट 26 जून रोजीथिएटरमध्ये दाखल होणार होता, परंतु देशातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे चित्रपटगृहे बंद राहिली. त्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार याची तारीख निर्माते लवकरच जाहीर करतील.