मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात उडी घेऊन व मुंबईवर वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेली अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असे चित्र सध्या तयार झाले आहे. मुंबई महापालिकेकडून कंगनाचे पाली हिल स्थित कार्यालय तोडण्यात आल्यानंतर तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिग्दर्शक करण जोहरवर टीका केली आहे.
'उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांच्या गँगने माझे कार्यालय तोडले. या आता माझ घर तोडा, तोंड तोडा. गुपचुपपणे तुम्ही काय करता, हे देशाने पाहावे. मी जगेल किंवा मरले, मात्र, तुमचं पितळ उघडं पाडणारचं, असे टि्वट कंगनाने केले आहे.
गेल्या 24 तासांत अचानक माझं कार्यालय अवैध घोषित करण्यात आलं. कार्यालयातील फर्निचर व इतर वस्तूंचे त्यांनी पूर्णपणे नुकसान केले आहे. ते पुन्हा माझ्या घरी येतील आणि उरलं-सुरलं सर्व तोडतील, अशा धमक्या मला येत आहेत. याचा मला आनंद आहे की, फिल्म माफियांच्या आवडत्या मुख्यमंत्र्याविषयीचं माझं मत खरं ठरलं, असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईला पाकव्यापत काश्मीर म्हटल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं होतं. वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्या दिल्या जात आहेत, असं सांगितले होते. तसंच आपण 9 तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हानही तीने दिले होते. यानंतर आज कंगना मुंबईत पोहोचली आहे. ती मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडून तीचे अवैध कार्यालय तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, या कारवाईच्या विरोधात कंगनाच्या वकिलाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. त्यावर महानगरपालिकेने आपली कारवाई थांबवावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच यासंदर्भात उत्तर देण्यासाठी पालिकेला गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. आपले कार्यालय तोडल्यामुळे कंगनाने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.