मुंबई- अभिनेत्री कंगना रनौत अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच चर्चेत असते. याशिवाय अनेक कलाकारांसोबतही तिचे वाद आहेत. हृतिक कंगना वाद तर काही दिवसांपूर्वी प्रत्येकाच्याच ओठी होता. यांनतर आता कंगनाने पत्रकारांनाही सोडले नाही. माझ्या चित्रपटांबद्दल चुकीच्या गोष्टी का लिहितोस? असा सवाल कंगनाने पत्रकाराला केला.
नुकतंच कंगनाच्या जजमेंटल हैं क्या चित्रपटाचं साँग लॉन्च इवेंट पार पडलं. याच इवेंटदरम्यान कंगना पत्रकारासोबत वाद घालायला लागली. कंगनाचं दिग्दर्शनीय पदार्पण असणाऱ्या मणिकर्णिका चित्रपटाबद्दल चुकीच्या गोष्टी लिहिल्यानं कंगनाने पत्रकाराला चांगलंच सुनावलं.
कंगना म्हणाली, तू माझ्या चित्रपटाबद्दल वाईट लिहिलं. तू एवढ्या खालच्या स्तराचा विचार कसा करू शकतो. मी हा चित्रपट करून काही चूक केली का? तू मला कट्टर देशभक्त म्हणालास, एका महिलेने देशप्रेमावर आधारित चित्रपट बनवला तर काय चुकीचं काम केलं? तिच्या या प्रश्नावर उत्तर देत पत्रकाराने म्हटलं, मी मणिकर्णिकाबद्दल एकही ट्विट केलं नाही. तू भलेही सध्या मोठ्या पदावर आहेस, मात्र तू कोणा पत्रकाराला धमकी देऊ शकत नाही.
हा वाद इथेच थांबला नाही, कंगनाने म्हटलं की, हा पत्रकार मणिकर्णिकाच्या चित्रीकरणावेळी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला होता. तीन तास तो तिथेच होता. यानंतर त्याने मला मेसेजही केले होते. मात्र, नंतर अचानकच त्याने माझ्या चित्रपटाबद्दल नकारात्मक गोष्टी लिहिण्यास सुरूवात केली. दरम्यान, पत्रकाराने हे आरोपदेखील फेटाळले आणि आपण कंगनाला कोणतेही मेसेज केले नसल्याचे म्हटले. यासोबतच आपण कंगनाची केवळ ३० मिनिटांची मुलाखत घेतली असल्याचेही तिने सांगितले.