मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान '८३' हा क्रिकेटवर आधारित चित्रपट बनवत आहेत. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये झालेल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. याचा थरार या सिनेमात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, कबीर खान यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानाने त्यांच्यावर ट्रोल होण्याची नामुष्की ओढवली आहे.
एका मुलाखतीत कबीर खान यांनी सांगितले की, १९८३ च्या अगोदर भारतीय क्रिकेटसंघाने एकाही वर्ल्डकपमध्ये एकही मॅच जिंकली नव्हती. नेमक्या याच विधानाला नेटकऱ्यांनी आक्षेप घेतलाय. भारतीय क्रिकेट संघाने १९७५ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिका संघाचा पराभव केला होता.
कबीर खान यांच्या विधानानंतर ट्रोलर्सनी टीकास्त्र सोडले आहे. सिध्दांत सिंग या युजरने म्हटलंय की '८३' हा चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक होतो. मात्र त्यांनी विकिपिडिया लेव्हलचीही माहिती घेतलेली नाही. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता आणि माझी उत्सुकता कमी झालीय. एका युजरने म्हटलंय की, तुम्हाला फॅक्ट्स माहिती नाहीत तर सिनेमा कशाला बनवता.
'८३' या चित्रपटात रणवीर सिंग कपील देव यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. त्याची पत्नी दीपिका पदुकोण कपीलच्या पत्नी रोमी भाटियाची भूमिका करत आहे. अभिनेता राज भसीन सुनिल गावसकर यांची भूमिका करत आहेत. साकिब सलीम मोहिंदर अमरनाथ, एमि वर्क बलविंदर सिंग संधू तर के. श्रीकांत यांच्या भूमिकेत जीवा दिसणार आहे. '८३' हा चित्रपट १० एप्रिलला चित्रपटगृहात दाखल होईल.