“या कलियुगात पैसा कोणाला नकोय आणि तो आपसूकच मिळत असेल तर ‘सोने पे सुहागा’. हल्ली पैश्याला अवाजवी महत्व प्राप्त झालंय. पूर्वी नातेसंबंधांना जास्त महत्व असायचे पण आता फार कमी प्रमाणात ते दिसते. समाजात हल्ली पैशालाच देव मानणारे अधिक आहेत. पैश्याचा हव्यास मनुष्याला कसे अधोगतीला घेऊन जाऊ शकतो आणि माणुसकी व प्रेम हे पैश्यापेक्षा नेहमीच वरचढ आहे असा संदेश आम्ही आमचा चित्रपट ‘कबाड - द कॉइन’ मधून देऊ इच्छितो. पैसा नसेल तरी खरं प्रेम कमी होत नाही आणि खूप पैसा असेल म्हणून खूप प्रेम मिळेल असेही नाही. हा चित्रपट पैशाच्या ‘ह्युमन सायकोलॉजी’ वर आधारित असून पैशालाच देव मानणाऱ्या लोकांना चपराक बसेल असा आहे. आणि आम्ही हे सर्व प्रामाणिकपणे, कुठलीही व्यावसायिक ऍडजस्टमेन्ट न करता, दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. यात नासिरुद्दीन आणि रत्ना पाठक शहा यांचा धाकटा मुलगा विवान शहा प्रमुख भूमिकेत असून त्याने ती भूमिका चोख बजावली आहे. दिग्दर्शक वरदराज स्वामी यांनी ही कथा अत्यंत तरलपणे हाताळली असून चित्रपटातील संदेश प्रेक्षकांना नक्कीच भावेल” असे चित्रपटाचे लेखक आणि असोसिएट डिरेक्टर शहजाद अहमद, आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी संवाद साधताना, म्हणाले.
शहजाद यांनी पुढे असे सांगितले की, “खरंतर हा एक रियॅलिस्टिक सिनेमा असून एक कबाडीवाला याचा हिरो आहे. बंधन, ज्याची भूमिका केलीय विवान शहाने, एक उच्चशिक्षित हुशार मुलगा आहे. त्याच्या वडिलांचे भंगार चे दुकान आहे. ‘प्रत्येक भंगारवाला एका अघटित सुवर्णदिनची वाट बघत असतो’ असे त्याचे वडील त्याला नेहमी सांगत. परंतु वडिलांच्या अकाली निधनानंतर बंधन नोकरीतून गुलामी करण्यापेक्षा वडिलोपार्जित कबाडीवाला बनण्यास अग्रक्रम देतो. रस्तोरस्ती हातगाडी घेऊन ‘भंगारवाला.....’ ओरडत फिरायला त्याला जराही कमीपणा वाटत नाही. त्याची बालपणीची मैत्रीण सविता, जिची भूमिका केलीय यशश्री मसुरकरने, जिचे वडील चांभार असतात, नेहमी त्याच्याकडून शिकत आयएएस बनण्याचे स्वप्न बघत असते. तसेच ती मनोमन बंधनवर प्रेमही करीत असते. एके दिवशी अचानकपणे त्याला एक पिशवी मिळते ज्यात मुघलकालीन सोन्याची नाणी असतात. खरंतर ही नाणी काही चोरांनी म्युझियममधून चोरलेली असतात व हाणामारीत पाण्यात फेकून दिलेली असतात. बंधन याबद्दल अनभिज्ञ असतो व त्यातील एक नाणे तो सविताच्या वडिलांना देतो ज्याचे त्यांना २ लाख रुपये मिळतात जे सविताच्या अभ्यासासाठी वापरले जातात. हातगाडी घेऊन फिरताना बंधन ला रस्त्यावर रोमा (झोया अफरोज) भेटते व त्याला भंगार घेण्यासाठी घरी बोलावते. त्याची हुशारी पाहून ती त्याला दुसरी अनेक कामे देते आणि त्यांच्या वरचेवर भेटीगाठी घडू लागतात. बंधन चक्क या सुंदर शहरी मुलीच्या प्रेमात पडतो. रोमाकडे तो व्यक्त होतो तेव्हा ती ते सर्व हसण्यावारी नेते आणि तो तिला आयुष्यभर खूष ठेवीन याचा पुरावा म्हणू एक नाणे देतो. एकेक नाण्याची किंमत एक -सव्वा करोडच्या घरात असते. रोमा आणि तिचा बॉयफ्रेंड झटपट श्रीमंत होण्यासाठी बंधन कडून मुघलकालीन नाणी बळकावण्याचा प्लॅन आखतात. पुढे प्रेम जिंकते की पैसा हे चित्रपटातून सविस्तररित्या मांडले आहे.”