मुंबई - गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला न्यायालयात हजर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजही ती न्यायालयात दाखल झाली नाही. कंगना जर पुढील तारखेस हजर राहिली नाही तर तिला अटक वॉरंट जारी करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
आज न्यायलयात कंगना रणौत गैरहजर राहिली. तिचे वकील अॅड. सिद्दिकी यांनी न्यायालयात तिची बाजू मांडली. कंगनाला कोरोनाची लक्षणे जाणवल्यामुळे तिची चाचणी घेण्यात आली आहे. याचा अहवाल आला नसल्यामुळे ती न्यायालयात आली नसल्याचे अॅड. सिद्दिकी यांनी सांगितले.
कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधीशांचा निर्णय मात्र अॅड. सिद्दिकी यांच्या या म्हणण्याला जावेद अख्तर यांचे वकील अॅड. भारद्वाज यांनी आक्षेप घेतला. यावर न्यायालयाने कंगनाला ताकीद दिली, की कंगना जर पुढील तारखेस हजर राहिली नाही तर तिला अटक वॉरंट जारी करण्यात येईल. यामुळे पुढील तारखेस कंगना न्यायालयात हजर राहणे अनिवार्य असणाार आहे. न्यायालयाने ही सुनावणी २० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली होती
जावेद अख्तर यांनी कंगना रणौतच्या विरोधात मानहानीचा खटला उच्च न्यायालयात दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कंगनाने न्यायालयात दाखल केली होती. यावर 1 सप्टेंबरला सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला आदेश राखीव ठेवला होता. 9 सप्टेंबर रोजी न्यायालयाने कंगनाची ही याचिका फेटाळली होती.
काय म्हटले होते कंगनाने?
कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.
हेही वाचा - सुनिल शेट्टीने मुंबई पोलिसांना दान केले 835 एअर प्युरीफायर