हैदराबाद - अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळत असल्याने झुंडची निर्मिती हिंदीत केली. भाषा माझ्यासाठी अडचण नाही. मला इतरही भाषेत चित्रपट करायचे आहेत, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
दिग्दर्शक नागराज मंजूळे यांचा झुंड हा हिंदी चित्रपट 4 मार्चला 2022ला प्रदर्शित होत आहे. ( Jhund Movie Release ) यानिमित्ताने आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य करणारे, सैराट आणि फँड्री या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजूळेंसोबत ईटीव्ही भारतने विशेष संवाद साधला. ( Nagraj Manjule on ETV Bharat ) या संवादादरम्यान त्यांनी झुंड चित्रपटाची प्रक्रिया कशी राहिली? बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? हा चित्रपट हिंदीत करण्याचं कारण काय? यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ( Nagraj Manjule Special Interview with ETV Bharat )
प्रश्न - झुंड या चित्रपटाची कल्पना कशी सुचली आणि ही संपूर्ण प्रक्रिया कशी राहिली?
उत्तर -झुंडच्या निमित्ताने हा प्रकल्प माझ्याकडे आला होता. मला सांगण्यात आले की ही रिअल लाईफ लोकांवर आधारित स्टोरी आहे, ज्यात आपण अमिताभ बच्चन सरांना सोबत घेऊन हा चित्रपट करू शकतो. यानंतर याबाबत मी रिसर्च केले. नागपूर येथील विजय बारसे जे आहेत, त्यांचे विद्यार्थी अखिलेश पौल आणि अन्य जवळपास 100-200 विद्यार्थी जे त्यांच्यासोबत झोपडपट्टी परिसरात खेळतात, त्यांच्याबाबत मी अभ्यास केला. मी समजून घेतले. त्यानंतर एक पटकथा (Screenplay) लिहिली. यानंतर बच्चन सरांना याबाबत ऐकवले. त्यांना ही स्टोरी आवडली. यानंतर चित्रपटाची शुटिंग सुरू झाली.
प्रश्न - अमिताभ बच्चनजी यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभव कसा होता?
उत्तर - खूप चांगला अनुभव होता. मागील आठ दिवसांपासून मी हेच सांगतोय. मात्र, तरी मी थकत नाहीये. मी ही गोष्ट ejoy करतोय. हा प्रश्न विचारला जातोय, याचा आनंद आहे. माझं स्वप्न नव्हतं की मी चित्रपट बनवेन. बच्चन सरांसोबत काम करायची संधी मिळाली तर जगात असा कोणताच दिग्दर्शक नसेन जो त्यांच्यासोबत काम करणार नाही. माझ्या जीवनप्रवासात अचानक ही संधी आली आणि हे सर्व झालं यासाठी मी आभारी आहे. ही स्वप्नापेक्षाही मोठी गोष्ट आहे. मी हे स्वप्नही पाहिले नव्हतं जे आज वास्तव आहे. माझ्यासाठी हे अमूल्य आहे.
प्रश्न - कोरोनामुळे चित्रपटाला उशिरा प्रदर्शित होतोय. मात्र, या कालावधीमध्ये तुम्हाला वाटलं की चित्रपटाच्या स्टोरीमध्ये काही बदल करावा?
उत्तर -कोरोनामुळे बदल करावा, असं नाही होत. वेळ जास्त मिळाला तर त्याला परत परत पाहिले जाते. मात्र, शेवटी चित्रपट तसाच बनवला जातो, जसा तो बनवायची इच्छा असते.
प्रश्न - नागराज जी, तुमच्या चित्रपटांमध्ये वंचित घटकांवर भाष्य केलं जातं. या तुलनेत मराठी चित्रपटांमध्ये या गोष्टी पाहायला नाही मिळत, असं तुम्हाला वाटतं का?