पद्मश्री पुरस्कार मिळवलेल्या कंगनाच्या चित्रपटांचे तर सर्वच चाहते आहेत. मात्र, तिचे वैयक्तिक आयुष्यही तितकंच प्रेरणादायी आहे. तिचं आयुष्य हे वादविवाद, मेहनत आणि प्रसिद्धी यांचीच एक कथा आहे.
चित्रपटसृष्टीत बॉलिवूड क्विन अशी ओळख मिळवलेल्या कंगनाकडे आज असा सन्मान आहे, जो कोणत्याही स्टारकीड्स किंवा आघाडीची अभिनेत्री किंवा अभिनेत्याकडे नाही. देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 'पद्मश्री'ने तिला सन्मानित करण्यात आलं आहे.... या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जाणून घेऊयात कंगना रनौतचा हा प्रेरणादायी प्रवास जिने फक्त चित्रपटातूनच नाही, तर आपल्या व्यक्तीमत्वानेही सर्वांवर छाप सोडली आहे....
हिमाचल प्रदेशच्या छोट्या गावात जन्मलेली कंगना बालपणापासूनच स्वतंत्र विचाराची राहिली आहे. घरात कडक वातावरण असतानाही अवघ्या १६ व्या वर्षीच कंगनाने स्वत:चं आयुष्य स्वत:च्या मर्जीने जगण्यासाठी दिल्लीचा रस्ता पकडला होता. दिल्ली येथे गेल्यावर तिने पार्ट टाईम मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली... इथुनच तिच्या स्ट्रगलला सुरुवात झाली होती.
त्यानंतर कंगनानं सुप्रसिद्ध असलेल्या अरवींद कौर यांच्या वर्कशॉपमध्ये अभिनयाचे धडे गिरवले.. काही दिवसांच्या प्रशिक्षणानंतर आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कंगनाने मायानगरी मुंबईत एन्ट्री घेतली. तिने बऱ्याच चित्रपटांच्या ऑडीशन दिल्या. यामध्ये दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या गँगस्टरचाही समावेश होता. या चित्रपटात सुरुवातीला अभिनेत्री चित्रांगदा सिंगला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र, चित्रांगदाने या चित्रपटातून माघार घेतल्यानंतर तिच्या जागी कंगनाला संधी मिळाली. हाच चित्रपट तिचा पदार्पणीय चित्रपट ठरला... हा चित्रपट हिट ठरला होता.
त्यानंतर कंगनाच्या 'वो लम्हे' आणि 'लाईफ इन अ मेट्रो' या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर दमदार व्यवसाय केला. मधुर भांडारकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'फॅशन' हा चित्रपट कंगनाच्या करियरला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेने सर्वांवर छाप पाडली. प्रियांका चोप्रापेक्षा अधिक कंगनाच्या अभिनयाची प्रशंसा झाली.
त्यानंतर २०११ साली प्रदर्शित झालेल्या 'तनू वेड्स मनू' या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये तिने साकारलेल्या तनूची बोल्ड, ग्लॅमरस भूमिका आजही लोकप्रिय आहे..
२०१३ हे वर्ष देखील कंगनासाठी महत्वपूर्ण ठरलं. तिचा 'क्विन' चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. विकास बहल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. याच चित्रपटानंतर ती बॉलिवूडची क्विन म्हणून ओळखली जाऊ लागली. १०० कोटी कमावणारा हा तिचा पहिला चित्रपट ठरला होता.