मुंबई -ख्यातनाम कोरिओग्राफर आणि असंख्य नर्तिकांच्या गुरू असलेल्या कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज निधन झाले. यामुळे असंख्य अभिनेत्रांसह बॉलिवूडवर दुःखाची छाया पसरली आहे. अनेक सेलेब्रिटींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. धक-धक गर्ल म्हणून ओळख असलेल्या माधुरी दीक्षित यांनीही आपल्या भावना व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे.
सरोज खान आणि माधुरी यांचे नाते गुर- शिष्याचे होते. माधुरीच्या असंख्य गाण्यांची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली. 'एक दोन तीन' आणि 'धक धक करने लगा' या गाण्यांच्या कोरिओग्राफीमुळे माधुरी लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचली होती. 'चोली के पीछे क्या है' ('खलनायक') और 'तम्मा तम्मा लोगे' ('थानेदार') यासारख्या गाण्यांनाही माधुरी आणि सरोज यांच्या जोडीने अजरामर बनवले आहे.
२००२ मध्ये आलेल्या देवदास चित्रपटातील 'डोला रे डोला' या गाण्याची कोरिओग्राफीही सरोज खान यांनी केली होती. सिनेमात हे गाणे माधुरी आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रीत झाले होते. या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सरोज खान न थकता शेवटपर्यंत नृत्याचे धडे आणि कोरिओग्राफी करीत राहिल्या. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या कलंक या चित्रपटातील माधुरीच्या गाण्याची कोरिओग्राफीही त्यांनी केली होती.आज त्यांच्या जाण्याने माधुरीला खूप दुःख झाले आहे.
माधुरी दीक्षित यांनी ट्विटरवर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. "माझी मैत्रीण आणि गुरू, सरोज खान यांना गमावले. माझ्या नृत्याला पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्यात मदत केल्याबद्दल मी तुमची नेहमी कृतज्ञ राहीन. जगाने आश्चर्यकारक प्रतिभावान व्यक्ती गमावली आहे. मला तुमची आठवण येत राहील. कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. सरोजजींना श्रध्दांजली," या शब्दात माधुरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा - कोरिओग्राफर सरोज खान यांनी घेतला जगाचा निरोप, बॉलिवूडवर शोककळा