मुंबई-कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कॉन्सर्ट आय फॉर इंडिया मध्ये सहभागी होत असल्याचा आनंद होत आहे, असे ट्विट सुपरस्टार शाहरुख खान यांनी केले आहे.
आय फॉर इंडिया ही कॉन्सर्ट रविवारी सांयकाळी 7.30 वाजता सोशल मीडिया वरुन प्रसारित होईल ती पाहा आणि सर्व ठिक होईल हे लक्षात ठेवा असे, शाहरुख खानने त्याच्या ट्विटमध्ये लिहले आहे. भारतातील आणि जगभरातील कलाकार या ऑनलाईन कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार आहेत.
दिग्दर्शक करण जोहर यांनी आय फॉर इंडिया या कॉन्सर्टचे आयोजन कोरोनाबाधितांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने केले आहे. यासाठी करण जोहर यांना आयोजनात झोया अख्तरचे सहकार्य मिळाले आहे.यामध्ये 85 कलाकारांचा सहभाग असेल.
करीना कपूर खान, आलिया भट्ट, ए.आर.रहमान, अरिजित सिंग, अनुष्का शर्मा, ह्रतिक रोशन, फरहान अख्तर आणि बँड, जावेद अख्तर, माधुरी दीक्षित, विकी कौशल यांच्यासह परदेशातील कलाकार आय फॉर इंडिया मध्ये सहभागी होतील.
जो जोनस, केवीन जोनस, ब्रायन अॅडम्स, निक जोनस, सोफी टर्नर, कॉमेडियन मिंडी कालिंग आणि लिली सिंग हे परदेशी कलाकार सहभागी होतील. या कॉन्सर्टचे प्रक्षेपण रविवारी सायंकाळी 7.30 मिनिटांनी फेसबुकवरुन होणार आहे.