मुंबई - कौटुंबिक मूल्य, आयकॉनिक गाणे, कसदार अभिनय, सहजसुंदर शैली अशा बऱ्याच कारणांमुळे 'हम आपके है कौन' चित्रपट ९० च्या दशकात तुफान गाजला होता. बॉक्स ऑफिसवरही तेव्हा ७२.४६ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट हा भारतीय सीनेसृष्टीतला सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. यामागची नेमकी कारणं काय आहेत, वाचा या स्पेशल रिपोर्टमधून...
दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सलमान खान आणि माधुरी दिक्षीतच्या केमेस्ट्रीचीही भुरळ तेव्हा तरुणाईवर पडली होती. या चित्रपटाने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि 'शोले' या चित्रपटांनाही मागे टाकत अव्वल स्थान पटकावले होते. एवढंच काय, तर आजही 'अॅमॅझॉन', 'नेटफ्लिक्स'वरही हा चित्रपट स्ट्रिम केला जातो.
जर चित्रपटसृष्टीतली सद्यस्थिती पाहिली तर, चित्रपटाचे दमदार कथानक चित्रपटाला यशस्वी बनवत आहे. अगदी अल्पबजेट चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. 'दंगल', 'अंधाधून', 'बाहुबली', 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक', 'बधाई हो' यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. त्यामुळेच कौंटुबिक विषय असलेल्या 'हम आपके कौन है' चित्रपटालाही चाहत्यांनी डोक्यावर घेतले.
प्रत्येक सोहळ्यासाठी मनोरंजक गाण्यांचा समावेश -
'हम आपके है कौन'मध्ये तब्बल १४ गाण्यांचा समावेश होता. यातील प्रत्येक गाणे प्रत्येक सोहळ्याला साजेसे ठरले आहे. या गाण्यांचे संगीत रामलक्ष्मण यांनी कंपोज केले होते. तर, लता मंगेशकर, एस. पी. सुब्रहमण्यम यांच्या आवाजाचा स्वरसाज या गाण्यांना चढल्यामुळे चाहत्यांच्या ओठांवर ही गाणी सहज रुळली.