हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक प्रयोगशील कलाकृती बनत असतात. यापैकीच एक सृजनशील दिग्दर्शक म्हणून रितेश बात्राकडे पाहिले जाते. 'लंच बॉक्स'सारखा एक जबरदस्त सिनेमा दिल्यानंतर आता त्यांनी 'फोटोग्राफ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
मुंबईच्या झोपडपट्टीत राहून गेट वे ऑफ इंडियावर पर्यटकांचे फोटो काढणाऱ्या रफीक या फोटोग्राफरची ही कथा आहे. रफीकची व्यक्तीरेखा साकारली आहे हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने.
गेट वे ऑफ इंडियावर फिरायला येणाऱ्या लोकांना फोटो काढण्यासाठी विनंती करणाऱ्या रफीकला मिलोनी भेटते. साध्या, निरागस मिलोनीचा तो फोटो काढतो. गावाकडे राहणाऱ्या आपल्या आजीला तो मिलोनीचा फोटो पाठवतो आणि नुरीच्या प्रेमात असल्याचे कळवतो. नातवाचे लग्न ठरतेय म्हटल्यावर आजी मुंबईला पोहोचते आणि नुरीला भेटण्याची इच्छा व्यक्त करते. रफीक मिलोनीला आजीची भेट घेण्याची विनंती करतो आणि ती तयार होते.