मुंबई- बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. 15 नोव्हेंबरला चंदिगडमध्ये दोघांचं लग्न झालं होतं. राजकुमार आणि पत्रलेखा यांनी 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करून संसार थाटला आहे. आता लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राजकुमारने सोशल मीडियावर एक मजेदार फोटो शेअर केला आहे. बॉलीवूड स्टार्स आणि चाहत्यांची या जोडप्याच्या फोटोला खूप पसंती मिळत आहे आणि ते लाइक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
'न्यूटन' आणि 'स्त्री' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता राजकुमार आता विवाहित कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. सध्या तो पत्नी पत्रलेखासोबत एन्जॉय करत आहे. राजकुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार फोटो शेअर केला आहे. या चित्रात राजकुमार आणि पत्रलेखा गवतावर पडलेले दिसत आहेत. पत्रलेखाच्या शरीराभोवती एक काळी रील गुंडाळलेली आहे.
हा फोटो शेअर करत राजकुमारने लिहिले की, 'मेरा यार तुम, मेरा प्यार तुम, मेरा दिल भी तुम, दिलदार तुम, शादी को एक महीना हुआ.' पत्रलेखाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही त्याच कॅप्शनसह हाच फोटो शेअर केला आहे. या जोडप्याच्या सुंदर फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्सच्या कमेंट्सही येत आहेत.