पूर्वी चित्रपटसृष्टीत वावरताना नावाला खूप महत्व दिले जाई. त्यावेळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कारणीभूत असेल किंवा लोकांना ते नाव सहजी उच्चारता यावे आणि त्यांच्या लक्षात राहावे याकरिता हा सर्व खटाटोप केला जायचा. परवाच दिलीप कुमार यांचे निधन झाले. त्यांचे खरे नाव मो. युसूफ खान होते. त्याकाळच्या सामाजिक आणि राजकीय मनस्थितीमुळे, कदाचित, देविका राणी ने युसूफ चे दिलीप कुमार असे नामकरण करण्यास सांगितले होते. चित्रपटसृष्टीत अनेक मुसलमान अभिनेते-अभिनेत्री यांनीदेखील हिंदू नावे धारण करून आपले करियर बनविले. परंतु अनेक हिंदू कलाकारांनीही आपले मूळ नाव बाजूला ठेऊन वेगळे ‘स्क्रीन-नेम’ धारण केले होते. हल्लीची पिढीतील कलाकार आपल्या मूळ नावानिशी, उच्चारायला कितीही कठीण असले तरी, मनोरंजनसृष्टीत वावरतात.
जुन्या जमान्यातील दोन नाव आज समोर येतात ज्यांनी आपले मूळ नाव बाजूला ठेऊन वेगळ्या नावाने खूप प्रसिद्धी मिळविली. अभिनेता संजीव कुमार आणि दिग्दर्शक-अभिनेता गुरुदत्त. हे दोनच नावे का तर आज ९ जुलै हा त्यांचा जन्मदिवस. संजीव कुमार या नावाने प्रसिद्ध असलेले हरीभाई जेठालाल जरीवाला यांचा जन्म ९ जुलै १९३८ आणि चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व अभिनेते गुरु दत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण यांचा जन्मदिन ९ जुलै १९२५. दोघांचेही चित्रपटसृष्टीतील योगदान वाखाणण्याजोगे आहे.
संजीव कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात रंगमंच अभिनेता म्हणून केली. मुंबईतल्या इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन द्वारा त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी १९६० मध्ये हम हिंदुस्तानी मधून लहानश्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुनील दत्त, जॉय मुखर्जी, आशा पारेख सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. पुढे नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट निशान (१९६५) होता. खरंतर त्यावेळी तो ‘बी-ग्रेड’ चित्रपटांमध्ये गणला गेला. परंतु संजीव कुमार ने मेहनत करीत या मारधाड ‘बी-ग्रेड’ चित्रपटांतून ‘ए-ग्रेड’ चित्रपटांमध्ये यशस्वी उडी घेतली. असे करू शकणारा तो एकमेव अभिनेता. १९७० साली त्याने ‘खिलोना’ या सामाजिक चित्रपटातून अप्रतिम भूमिका करत आपला मुख्य प्रवाहातील चित्रपटांचा मार्ग मोकळा करून घेतला.
त्याआधी त्याने दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘संघर्ष’ मधून आपले अभिनयाचे नाणे खणखणीतपणे वाजविले होते. तेव्हा असंही बोललं जात होतं की त्याने दिलीप कुमार ला ‘खाल्ला’ होता. दिलीप कुमार ला हे रुचलं नव्हतं आणि त्याने ‘विधाता’ मध्ये संजीव कुमार बरोबर समोरासमोर सीन करण्यास नकार दिला होता असे कळते. त्या सीन मध्ये दिलीप कुमार संजीव कुमार ला बरेच बोलतो आणि आपली वाक्य संपल्यावर त्याच्या तोंडावर दार लावून घेतो आणि संजीव कुमार त्या दारासमोर आग पाखडतो. आधी हा सीन ते दोघे समोरासमोर उंभे राहून करणार होते परंतु दिलीप कुमार च्या डोक्यात ‘संघर्ष’ घोळत होता म्हणून त्याने ही पळवाट काढली अशी कुजबुज विधताच्या सेटवर चालली होती. ६ नोव्हेंबर १९८५ रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि संजीव कुमारचा मृत्यू झाला.