मुंबई -अभिनेत्री रिया चक्रवर्तीने एमटीव्हीवरील एका शोमधून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. मात्र, तिला तिच्या अभिनयापेक्षा सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामुळे जास्त ओळखले जाऊ लागले. या पाच वर्षात तिला जेवढी प्रसिध्दी मिळाली नाही, तेवढी तिला या एका वर्षात मिळाली. ही प्रसिद्धी जरी असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि करीअरसाठी मदत करणारी नक्कीच नव्हती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे तिला त्याच्या मृत्यूनंतर अनेक आरोपांचा सामना करावा लागला. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे रियाचा आज २९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिला ईटीव्ही भारतकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया... आणि जाणून घेऊया तिचा आतापर्यंतचा प्रवास..
आर्मी कीड
अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जन्म 1 जुलै 1992 मध्ये बंगळुरूमध्ये झाला. वडील लष्करी अधिकारी असल्याने तिचे शिक्षण अंबाला येथे झाले. २००९ मध्ये तिने करीअरची सुरुवात एमटीव्हीच्या टीवीएस स्कूटी टीन डिव्हा या रिअॅलिटी शोमधून केली होती. हा शो ती जिंकली तर नाही. मात्र, पहिली रनरअप बनली. त्यानंतर तिने एमटीव्हीसाठी अनेक शोजचे अँकरिंग केले. त्यानंतर 'मेरे डॅड की मारुती' आणि 'सोनाली केबल' या चित्रपटात ती दिसली.