मुंबई- राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शिका भावना तलवार दिग्गज आयकॉनिक फिल्ममेकर आणि अभिनेता गुरुदत्त यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. बायोपिकचे नाव 'प्यासा' आहे. तलवार आपल्या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करण्याच्या विचारात आहेत. गुरू दत्तचे आयुष्य तीव्र आणि गुंतागुंतीचे आहे, म्हणून तलवार यांना ही कहाणी लिहिण्यास सात वर्षे लागली. तरीही हा बायोपिक वेब सीरिज स्वरूपात कथन करण्याऐवजी त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून मांडायचे ठरवले आहे.
तलवार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "त्यांचे व्यक्तिमत्त्व 'लार्जर दॅन लाईफ होते'. १० वर्षाच्या आतच त्यांनी एक निर्माता, अभिनेता, चित्रपट व्यवसायिक म्हणून यश मिळवले. चाहत्यांची भरपूर प्रेम त्यांना लाभले होते. गीता दत्तशी प्रेम आणि पत्नी म्हणून झालेला स्वीकार, असे सर्व काही त्यांना मिळाले होते. यासोबत तद्यांनी दुःखही पाहिले होते. हे सर्व छोट्या पडद्यावर दाखवणे शक्य नाही. हा एक फिचर फिल्मचा विषय आहे.''