मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष झालेला दुसरा कर्णधार सौरभ गांगुली याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा झाली आहे. निर्माता लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी दादाच्या बायोपिकची ही घोषणा केली आहे. यासंबंधीचे अधिक तपशील लवकरच जाहीर होतील असे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या लेटेस्ट ट्विटमध्ये म्हटले आहे.
सौरभ गांगुलीचा जीवन प्रवास एक दमदार संघर्षाची रंजक कथा आहे. दादाचे देशभर करोडो चाहते आहेत. त्यामुळे त्याचा बायोपिक कधी पाहायला मिळणार याची प्रतीक्षा सुरू होती. आता त्याला मुर्त रुप येत असल्याचे दिसते. गांगुली हा भारतीय क्रिकेटमध्ये झालेल्या बदलाचा मोठा चेहरा आहे. गांगुली चांगला कर्णधारच नव्हता तर एक उत्तम फलंदाजही होता. कर्णधार असताना भारतीय क्रिकेट संघाचा गांगुलीने कायापालट केला. गांगुलीचे क्रिकेट पदार्पण ते बीसीसीआय अध्यक्ष हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.
गांगुली 2000 ते 2004 या काळात भारतीय संघाचा कर्णधार होता. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. गांगुलीने भारतासाठी 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता. भारताकडून 100पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे. गांगुलीच्या नावे 15 कसोटी शतके आणि 22 एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत 10 हजार धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.
दावा उजव्या हाताने लिहितो आणि डाव्या हाताने करतो फलंदाजी
सौरव गांगुली हा डावखुरा आहे. ज्या प्रत्येक क्रिकेट चाहत्याने सौरव गांगुलीला खेळताना पाहिले आहे, त्यांना हे माहीत असेल की, 'दादा' उजवा हात लिहिण्यासाठी वापरतो आणि डाव्या हाताने फलंदाजी करतो. 2004 मध्ये सौरवला पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय त्याला 'बांगा बिभुषण' या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे. 2008 मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
गल्ली क्रिकेट ते भारतीय संघासाठी निवड -
सौरवचा मोठा भाऊ स्नेहाशिषल क्रिकेट खेळायचा. सौरवनेही मोठ्या भावानंतर क्रिकेट खेळायला सुरवात केली. गल्लीत क्रिकेट खेळत असताना सौरवची निवड शाळेच्या क्रिकेट संघात झाली. त्यानंतर राज्य संघात निवड झाल्यानंतर सौरवने भारतीय संघाकडून खेळण्याचा विचार केला. त्याचे हे स्वप्न 1992 मध्ये पूर्ण झाले