पणजी - मॉडेल अभिनेत्री पूनम पांडेने अश्लिल व्हिडिओ शूट केल्या प्रकरणी तिला गोवा पोलिसांनी अटक केली होती. गोव्याच्या समुद्र बीचवर असे फोटो शूट करण्याला बंदी आहे. अशातच ४ नोव्हेंबर रोजी मॉडेल अभिनेता मिलींद सोमणने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीचवर विवस्त्र होऊन धाव घेतली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे मिलींदवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
गोव्याच्या वास्को पोलीस स्टेशनमध्ये मिलींद सोमणच्या विरोधात 'गोवा सुरक्षा मंच' या संघटनेने तक्रार दाखल केली आहे. मिलींदने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोमुळे गोव्याच्या संस्कृतीचा अपमान होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अद्याप मिलींद सोमणवर कोणतीही कारवाई झालेली नाही. परंतु चौकशीसाठी त्याला पोलिसांसमोर जावे लागेल आणि कारवाईचाही सामना करावा लागेल.