मुंबई - शहरातील लाखो कामगार सिनेसृष्टीत पडद्याआड काम करत असतात. नुकतीच राज्य सरकारने चित्रपट मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे, या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी 5 लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीज संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबद्दलची माहिती संघटनेचे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी दिली.
कामगार आणि टेक्निशियन यांची सर्वात मोठी आणि जुनी संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीजने कामगारांच्या सुरक्षा उपाययोजनांबाबतही सूचना केल्या आहेत. चित्रीकरण करणारे 80 टक्के कामगार हे आपल्या गावी गेले आहेत. मात्र, जे मुंबईत आहेत त्यांना आणि इतर कामगारांना अनेक चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी आर्थिक मदत केली आहे. आता चित्रीकरण सुरू करण्यासाठी कामगारांची आवश्यकता भासणार आहे, त्यामुळे, त्यांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे तिवारी यांनी सांगितले.