मुंबई- मिका सिंगने नुकतंच वेस्टर्न इंडिया सिने इम्पलॉईज आणि ऑल इंडिया सिने एम्लॉईज असोसिएशनसमोर आपली बाजू मांडली आहे. ज्यानंतर या दोन्ही असोसिएशननं मिकावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. पाकिस्तानात केलेला शो आपण वर्क कमिटमेंट पाळण्यासाठी केला असल्याचं मिकाने म्हटलं आहे.
मी ३ ऑगस्टला पाकिस्तानातील गुरूद्वाराच्या दर्शनासाठी गेलो होतो. पाकिस्तानातील तो कार्यक्रम फार आधीच ठरला होता. पुलवामा हल्ला त्यानंतर झाला. त्यामुळे वर्क कमिटमेंट पाळण्यासाठी आपण हा शो केला असल्याचे मिकाने स्पष्ट केले. यासोबतच अशी चूक पुन्हा करणार नाही, असे म्हणत मिकाने देशाची माफी मागितली आहे.
काय आहे प्रकरण -
मिकाने पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयाच्या लग्नात हजेरी लावून परफॉर्म केलं होतं. ही बाब उघड झाल्यानंतर, बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या ‘ऑल इंडिया सिने एप्लॉईज असोसिएशन’ आणि ‘वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज असोसिएशन’ या दोन्ही संघटनांनी स्वतंत्र पत्रक काढून मिकावर बहिष्कार घालण्याचं आवाहन संपूर्ण इंडस्ट्रीला केलं. त्यानुसार त्याच्यासोबत कोणतंही काम न करायची ताकीद संबंधित प्रॉडक्शन हाऊस, म्यझिक कंपनी, निर्माते, दिग्दर्शक यांना देण्यात आली. त्याच्यासोबत सुरू असलेली सर्व कामे रद्द करण्याची विनंती म्युझिक कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध चिघळलेले असताना आणि मायभूमीच्या रक्षणासाठी अनेक जवान सीमेवर शहीद होत असताना देशापेक्षा पैशाला महत्त्व दिल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं या दोन्ही संघटनांनी स्पष्ट केलं.
यानंतर मिकाने वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष बी एन तिवारी यांना आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली. ज्यानंतर आज पत्रकार परिषदेत त्याने पाकिस्तानाच जाण्याचं कारण सांगत भारतीयांची माफी मागितली.