मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान आणि त्याची माजी पत्नी रीना दत्ता २००२ मध्ये विभक्त झाले. त्या अगोदर त्यांचा १६ वर्षाचा सुखी संसार सुरू होता. त्यांनी लपून विवाह केला होता आणि 'कयामत से कयामत तक' चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत तो त्यांनी लपवला होता, हो सर्वश्रुत आहे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की करियर आणि पत्नीची निवड करायची झाल्यास तो कशाची निवड करु शकला असता.
'कयामत से कयामत तक'च्या रिलीजच्या वेळी, आमिरला त्याच्या पीआर टीमने सांगितले होते की, लग्न झालेल्या हिरोला महिला प्रेक्षकांकडून स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे सिनेमा रिलीज होईपर्यंत लग्नाचे हे रहस्य गुलदस्त्यातच ठेवावे लागेल. आमिरला याबाबत खात्री नव्हती परंतु हा धोका पत्करणे त्याला कठिण जाणारे होते.
रीनासोबतच्या आपल्या लग्नाबद्दल बोलताना आमिरने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, "कयामत से कयामत तकच्या सेटवर रीना अनेकवेळा दिसली असल्यामुळे आई वडिलांपासून ही गोष्ट लपून राहिली नव्हती. पापा कहते है या गाण्यात ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. लग्न झाल्याचे कळल्यामुळे माझ्या करियरवर जर परिणाम होणार असला तर मी त्याची फिकीर करीत नव्हतो. जर मला करियर आणि पत्नीची निवड करायची झाली असती तर मी पत्नीला निवडले असते.''