मुंबई - अभिनेता नसिरुद्दीन शाह यांची मुलगी हीबा शाह हिच्यावर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर आहे. यासाठी कलम ३२३, ५०४, ५०६ या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हीबा शाहवर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... अभिनेत्री हीबा शाहची सुप्रिया शर्मा नावाची एक मैत्रीण आहे. या मैत्रिणीने 16 जानेवारीला तिच्या दोन मांजरींच्या नसबंदीसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. मात्र काही कारणास्तव ती जाऊ शकणार नव्हती. त्यामुळे तिने हीबाला दोन्ही मांजरींना घेऊन क्लिनिकला जायला सांगितले. सुप्रियाने सांगितल्यानुसार हीबा दोन्ही मांजरींना घेऊन गेली.
येथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हीबा 16 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी आली. त्यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी पाच मिनिटे थांबण्याची विनंती केली. कारण त्यावेळी दवाखान्यात सर्जरी सुरु होती. मात्र हीबाला काही मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर राग आला आणि तिने पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांवर आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर तिने कर्मचाऱ्यांना धमकी देत मारहाण केल्याचे आरोप त्यांनी केला आहे.
हीबा शाहवर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलीस यांनी केली आहे. याच्या आधारानेच गुन्हा दाखल झाल्याने तिच्या अडचणीत वाढ होऊ शकते.