कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक कोलमडले. लॉकडाऊनमुळे सुरु झालेली चित्रपटगृहे पुन्हा बंद झाली आणि अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले. यावर उपाय म्हणून काही निर्मात्यांनी ओटीटी वर चित्रपट रिलीज करण्याचा पर्याय शोधला. एकदा प्रदर्शन पुढे ढकललेल्या फरहान अख्तर आणि मृणाल ठाकूर अभिनित ‘तूफान’ च्या प्रदर्शनाची तारीख ठरली असून येत्या १६ जुलै ला त्याचा ग्लोबल प्रीमिअर अमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार आहे. रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे, अमेझॉन प्राइम व्हिडीओ सादर करत असलेल्या या सिनेमात परेश रावल आणि मृणाल ठाकूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
‘भाग मिल्खा भाग’ या यशस्वी चित्रपटानंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी ’तूफान’ मधून एक दमदार ‘पंच’ पुन्हा एकदा घेऊन आली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या अजीज अली चा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते.
‘तूफान’ मध्ये बॉक्सिंग एक खेळ म्हणून जीवंत होतोच. शिवाय, आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवनप्रवासही यात रेखाटला आहे. ही कथा आहे जिद्दीची, तगून राहण्याच्या इच्छेची, चिकाटीची आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा यांची ही कथा आहे.