मुंबई- बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी लवकरच अमिताभ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असून काही दिवसांपूर्वीच 'चेहरे' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. यापाठोपाठ आता इम्रानने आपल्या आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली असून 'इजरा' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे.
हा 'इजरा' या मल्ल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे. मूळ 'इजरा' चित्रपटाचे दिग्दर्शक जय क्रिशनन हेच हिंदी रिमेकचंही दिग्दर्शन करणार आहेत. हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट असणार असून भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, कृष्ण कुमार आणि अभिषेक पाठक यांची निर्मिती असणार आहे.
दरम्यान २०१७ मध्ये आलेल्या 'इजरा' या मल्ल्याळम चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. यात पृथ्वीराज सुकूमरन आणि प्रिया आनंद यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा एका जुन्या पेटीभोवती फिरणारी होती. जी घरी घेऊन आल्यानंतर प्रियाच्या घरी वेगळ्याच गोष्टी घडायला सुरूवात होते.
इम्रान हाश्मीबद्दल बोलायचं झाल्यास त्याने याआधीही अनेक हॉरर चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यात 'राज - द मिस्ट्री', 'राज ३', 'एक थी डायन' आणि 'राज रिबूट'सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता त्याच्या या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.