नवी दिल्ली -बॉलिवूड दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे आज हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दुपारी साडेचार वाजता निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. कामत हे लिव्हर सिरोसिस आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडमध्ये स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलेला हरहुन्नरी दिग्दर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
रूग्णालयाने प्रसिद्ध केलेले पत्र मुंबईतील रुईया महाविद्यालयापासून आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या कामत यांनी कायमच वेगळेपण जपलं. महाविद्यालयीन काळात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मंजुळा' या एकांकिकेने त्यावेळी सर्व स्पर्धेत बाजी मारली. तिथूनच त्यांच्या नावाला एक वेगळं वलय प्राप्त झालं. तेव्हापासूनच रुईयाच्या नाक्यावर त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू झाला.
निशिकांत कामत यांनी 'डोंबिवली फास्ट' या मराठी सिनेमाद्वारे सिनेदिग्दर्शनात पदार्पण केलं. 11/7 च्या मुंबई ट्रेन ब्लास्टवर आधारित 'मुंबई मेरी जान' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर 'दृश्यम', 'मदारी', 'फोर्स', 'रॉकी हँडसम' यासारख्या सिनेमाचं दिग्दर्शन करत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. कामत यांनी मराठीमध्ये रितेश देशमुखने अभिनय केलेल्या 'लय भारी' या सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे.
दिग्दर्शनासोबत गेल्या काही वर्षात त्यांनी अभिनयातही हात अजमावला. मराठीत 'सातच्या आत घरात' या सिनेमात त्यांनी अभिनय केला. या सिनेमाचं लेखनही त्यांनी स्वतःच केलं होतं. तर, हिंदीत 'रॉकी हँडसम', 'डॅडी' या सिनेमातही त्यांनी अभिनय केला होता.
गेल्या काही वर्षांपासून त्यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास होता. हैदराबादमध्ये असताना हा आजार बळावल्याने त्यांना गचिबोली येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज दुपारी त्यांची या आजाराशी सुरू असलेली झुंज कायमची थांबली. त्यांच्या जाण्याने एक सिद्धहस्त दिग्दर्शक आणि चांगला मित्र हरपल्याची भावना मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीकडून व्यक्त केली जात आहे.