मुंबई -बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे वार्धक्याशी संबंधित त्रासामुळे रुग्णालयात निधन झाले. अभिनयाचा बादशाह असलेल्या दिलीप साब यांची एक खास लकब आणि अभिनय शैली होती. भारतात स्टारडम रुजवणाऱ्यांपैकी ते प्रथम होते. खऱ्या अर्थाने भारताचा पहिला सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख होती. आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
दिलीप साब यांचा जन्म ११ डिसेंबर रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे युसुफ खान या नावाने फळ व्यापारी लाला गुलाम सरवर यांच्या घरी झाला. पुढे ही सरवार कुटुंब महाराष्ट्रातील नाशिकमध्ये देवळाली येथे आले. युसुफ यांचे शिक्षणही देवळालीतील बार्न्स स्कूलमध्ये झाले.
१९३० च्या उत्तरार्धात, सरवार कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले, परंतु नवीन ठिकाणी युसूफचे लक्ष जास्त काळ टिकले नाही. युसुफ यांनी आपला मुक्काम पुणे येथे हलवला. त्याकाळातील भारतीय सिनेमाची लोकप्रिय नायिका देवकी राणी यांच्याशी झालेल्या बेटीनंतर युसुफ यांचे आयुष्यच बदलले. तिथूनच युसुफ यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली आणि युसुफ खान यांनी दिलीप कुमार हे नाव धारण केले. आणि अशा प्रकारे अखेर भारताला पहिला महान सुपरस्टार मिळाला.
सहा दशकात ५७ चित्रपटात केले काम
दिलीप कुमार यांना १९४४ मध्ये अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित 'ज्वार भाटा' हा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटामुळे त्यांनी तत्कालिन फिल्म इंडस्ट्रीचे लक्ष वेधून घेतले. पुढील ६-७ वर्षात त्यांच्या नावावर 'जुगनू', 'शहीद', 'मेला', 'आन', 'दाग', 'आरझू' आणि 'दीदार' यासारखे चित्रपट होते. याकाळात दिलीप कुमार यांची कारकिर्द बहरत चालली होती आणि एक स्टार घडत होता. ही तर फक्त एक सुरुवात होती. त्यानंतरच्या वर्षांत दिलीप साबने आम्हाला देवदास (१९५५), आझाद (१९५५), नया दौर (१९५७), मधुमती (१९५८), पैगाम (१९५९), कोहिनूर (१९६० ), मुघल-ए-आजम (१९६०) आणि गंगा जमुना (१९६१) असे एकाहून एक सरस चित्रपट दिले. या सहा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ५७ चित्रपटात काम केले. त्यापैकी दोन बंगाली होते. मेहबूब खानचा 'मदर इंडिया', गुरू दत्तचा 'प्यासा', आणि राज कपूरचा 'संगम' हे तिन्ही चित्रपट पहिले दिलीप कुमारला ऑफर केले होते. मात्र, काही कारणाने त्यांनी हे चित्रपट नाकारले. त्यांनी डेव्हिडचा 'लॉरेन्स ऑफ आर्बिया' या चित्रपटही नाकारला.
'किला' हा अखेरचा चित्रपट
दिलीप कुमार हे १९७६ ते १९८१ या काळात रुपेरी पडद्यापासून दूर होते. १९८१ मध्ये ते क्रांती या सिनेमातून पुन्हा परतले. त्यानंतर 'विधाता', 'शक्ती', 'मशाल' आणि १९८६ मध्ये 'कर्मा' हा चित्रपट त्यांनी केला. अर्थातच या सर्वच चित्रपटांना लोकप्रियता लाभली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपले वय झाल्याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे सुपरस्टार या पदाची झूल त्यांनी उतरायची ठरवले होते. १९९१ मध्ये त्यांनी 'सौदागर' हा चित्रपट बनवला. हा त्यांचा संस्मरणीय ठरलेला अखेरचा सिनेमा होता. पण किला हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता.
पाकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित