मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान तामिळ सुपरहिट 'विक्रम वेधा' चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी सैफ अली खानबरोबर पुन्हा एकत्र येणार होता, पण नंतर तो अचानक या चित्रपटातून बाहेर पडला. सुरुवातीला असा विचार केला जात होता की तो स्क्रिप्टवर समाधानी नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. परंतु नव्या बातमीनुसार लाल सिंग चढ्ढा चित्रपटाच्यावेळी विजय सेतुपतीशी झालेल्या मतभेदामुळे आमिर खानने हा चित्रपट सोडला आहे.
आमिर या चित्रपटामध्ये वेधा ही व्यक्तीरेखा साकारणार होता. खलनायकी व्यकेतीरेखा मूळ तामिळ चित्रपटामध्ये विजय सेतुपतीने रंगवली होती. विक्रम वेधा हा चित्रपट आमिर खानने सोडल्याची बातमी अलिकडे झळकली होती. यामध्ये त्याने क्रिएटिव्ह कारण देत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र विजय सेतुपतीने साकारलेली भूमिका त्याला करायची नव्हती हेच खरे कारण असल्याचे समजते. लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात विजय सेतुपती काम करणार होता. मात्र त्यानंतर त्याने हा चित्रपट सोडल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांच्यामध्ये मतभेद झाल्याचेही बोलले जात होते.