‘जो भी करनेका, वो स्टाईल में करनेका’ या उक्तीप्रमाणे वागणाऱ्या करण जोहरने तो दिग्दर्शन ‘मिस’ करतोय असे सांगितले होते. आता करण जोहर तब्बल पाच वर्षांनंतर दिग्दर्शकाची टोपी डोक्यावर चढवत आहे. ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रदर्शित होऊन ५ वर्षे उलटून गेली आहेत. परंतु इतका काळ निर्मितीत अडकलेला करण चित्रपट दिग्दर्शनापासून फार काळ लांब राहू शकत नाहीये. करण जोहर आणि रोमँटिक चित्रपट हे जोडीदार आहेत आणि त्याचा आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ नावाप्रमाणेच प्रेमकहाणी तर आहेच परंतु त्यात इतर भावनांचे अनोखे मिश्रण असणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग व आलिया भट्ट यांची नावे आधीच जाहीर झाली होती आता त्याच्यासोबत असणार आहेत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी सारखे तगडे कलाकारसुद्धा.
‘गुड्डी’, ‘चुपके चुपके, ‘शोले’ सारख्या चित्रपटांतून एकत्र चमकलेले धर्मेंद्र आणि जया बच्चन रणवीर सिंगच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते पहिल्यांदाच जोडीने दिसणार असून आधी ते सिनेमांत एकत्र असले तरी एकमेकांसोबत नव्हते. त्यामुळे त्या दोघांसाठी हा चित्रपट स्पेशल असेल. तसेच नेहमीच आशयघन चित्रपट करणारी शबाना आझमी आलिया भटच्या आईच्या भूमिकेत असणार आहे. शबानाचा रोल तगडा असणारच कारण अन्यथा तिने हा चित्रपट स्वीकारलाच नसता. एकंदरीत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळेल हे नक्की.