नवी दिल्ली - बॉलिवूड गायक यो यो हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार यांनी त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र, सुनावणीदरम्यान हनी सिंग अनुपस्थितीत राहिला. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे न्यायालयाने म्हटलं. तसेच 3 सप्टेंबरला पुढील सुनावणीच्या वेळी हनी सिंगला न्यायालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हनी सिंगला वैद्यकीय अहवाल आणि आयकर विवरण जमा करावे लागेल. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे न्यायालयाने त्याच्या वकिलांना म्हटलं. तसेच लवकरात लवकर वैद्यकीय अहवाल आणि आयकर विवरणपत्र दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही त्याच्या वकिलांनी न्यायालयात दिली. हनीची प्रकृती ठिक नसून न्यायालयात वैयक्तिक हजेरीपासून त्याला सूट देण्यात यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटळली असून हनी सिंगला पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार आहे.
शालिनीचा मोठा खुलासा -
हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार यांनी 'घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण' कायद्यांतर्गत दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात हनीविरोधात 3 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. याचिकेत हनी सिंगवर शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. तसेच सासरे सरबजीत सिंग, सासू भूपिंदर कौर आणि नणंद स्नेहा सिंग यांच्यावरही घरगुती हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शालिनी तलवारने हनी सिंगकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. याचिकेमध्ये दरमहा पाच लाख रुपये मासिक खर्च म्हणून देण्याची मागणी करण्यात आली असून दिल्लीत घराचीही मागणी केली आली आहे.
वादग्रस्त हनी सिंग -
2012 मध्ये दिल्लीत झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर हनी सिंगने एक अश्लिल गीत गायले होते. यामध्ये महिलांचा अपमान होत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. हा खटला उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. अक्षय कुमारच्या बॉस या सिनेमात हनीने पार्टी ऑल नाईट हे गीत गायले होते. यात काही अश्लिल शब्दांचा वापर झाला होता. याबद्दल त्याला दिल्ली उच्च न्यायालयाच्या चकरा माराव्या लागल्या होत्या.
हेही वाचा -'हनीमून'पासूनच 'हनी सिंग'ने मांडला होता छळ, शालिनीचा मोठा खुलासा