मुंबई - 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (डीडीएलजे) चित्रपटाला आज मंगळवारी २५ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटातील रोमँटिक भूमिका करण्याबद्दल शाहरुख स्वतःवरच विश्वास नव्हता असे सांगून त्याने सर्वांना चकित केले आहे.
शाहरुख म्हणाला, "बर्याच लोकांनी मला सांगितले होते की मी हिरोच्या कल्पनेपेक्षा वेगळा आहे. कदाचित मी इतका सुंदर नव्हतो, किंवा मी रोमँटिक भूमिकांसाठी जसा लागतो तसा नव्हतो. त्यामुळे मला असे वाटले की मी रोमँटिक भूमिकांसाठी योग्य नाही. शिवाय मी महिलांच्याबाबतीत लाजराही आहे आणि त्यामुळे रोमँटिक गोष्टी कशा बोलायच्या याबाबत मी साशंक होतो.''
२० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेल्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये एसआरके आणि काजोल यांनी अभिनय केला होता. हा चित्रपट इंग्लंडमध्ये राहणाऱ्या राज (एसआरके) आणि सिमरन (काजोल) यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. याच चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पडद्यावर एनआरआय रोमान्सचा ट्रेंड सुरू केला आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा हा कायमचा भाग बनला. आज या चित्रपटाला २५ वर्षे पुर्ण होत असल्यामुळे यशराज फिल्म्सच्या वतीने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि चित्रपटाच्या आठवणी पोस्ट करण्यात येत आहेत.