अभिनेता टायगर श्रॉफ आणि कोरिओग्राफर व दिग्दर्शक अहमद खान यांची चांगलीच नाळ जुळलीय. ‘बागी २ व ३’ च्या यशानंतर ते पुन्हा एकदा ‘हिरोपंती २’ साठी एकत्र आलेत. त्यांच्यासोबत त्यांना भरघोस आर्थिक पाठिंबा देणारा निर्माता साजिद नाडियादवाला सुद्धा पुन्हा एकदा त्यांच्यासोबत निर्मात्याच्या भूमिकेत असेल. साजिद नाडियादवाला त्याच्या भव्यदिव्य निर्मितीमूल्यांसाठी ओळखला जातो. याही चित्रपटातील ॲक्शन-सीन्स खतरनाक तर असणारच आहेत परंतु ते चित्रपटाचा प्रमुख भाग असणार आहेत. त्यामुळे ते उत्तमरीत्या आणि नाविन्यपूर्ण रीतीने चित्रित करण्यासाठी हा यशस्वी निर्माता पूर्ण ‘एच-२’ टीमला रशियाला घेऊन जाणार आहे.
हिरोपंती २ शी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "टीम ‘एच-२’ मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटातील प्रमुख ॲक्शन दृश्य आणि एका गाण्याचे चित्रीकरण करण्याची योजना बनवत असून तिथल्या स्थानिक टीमसोबत मिळून नयनरम्य लोकेशनचा शोध घेत आहे. शिवाय चित्रपटातील लार्जर दॅन लाइफ ॲक्शन दृशांना चित्रित करण्यासाठी अनेक स्टंट डिजाइनर्ससोबत बोलणे सुरु आहे ज्यामध्ये एक नाव सुप्रसिद्ध मार्टिन इवानो यांचे आहे. मार्टिन इवानो स्कायफॉल (२०१२), द बॉर्न अल्टीमेटम (२००७) आणि द बॉर्न सुप्रमसी (२००४) या ॲक्शन-पॅक्ड चित्रपटांसाठी ओळखले जातात."