मुंबई- कोरोना विषाणूचा फटका सिनेसृष्टीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे चित्रपटगृहही बंद असल्याने तयार चित्रपटही प्रदर्शित होऊ शकले नाहीत. अशात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणाचा गुलाबो सिताबो चित्रपट डिजीटल रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर आता आणखी सहा चित्रपटांचे डिजीटल प्रीमीयर ऑनलाईन दाखवले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यात विद्या बालन स्टारर शकुंतला देवीसह इतरही चर्चित चित्रपटांचा समावेश आहे. पुढील काही महिन्यांत हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे सर्व चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न होता थेट अमॅझोन प्राईमवर पाहता येणार आहेत. हिंदीशिवाय पोनमगल (तमिळ आणि तेलुगू), सुफियम सुजातायम ( मल्ल्याळम), लॉ (कन्नड), फ्रेंच बिर्याणी (कन्नड) हे चित्रपटही ऑनलाईन प्रदर्शित करण्यात आले आहेत.