मुंबई - कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे देशभर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये सामान्य लोकांना जसा याचा फटका बसलाय तसाच तो बॉलिवूड सेलेब्रीटींनाही बसलाय. आज या घडीला आमिर खान, गोविंदा, अक्षय कुमार, परेश रावल, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रोहित सराफ, विकी कौशल, भूमी पेडणेकर असा दिग्गज बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज यात कॅटरिना कैफच्या नावाचाही समावेश झाले आहे.
कॅटरिना कैफने आपल्या सोशल मीडियावरुन कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हटले आहे. तिने एक निवेदन प्रसिध्द केले आहे.
कोरोनाची लागण झालेली पहिली सेलेब्रिटी कनिका कपूर
गेल्या वर्षभरात बॉलिवूडच्या अनेकांना कोरोना व्हायरसने जखडले. यामध्ये सर्वात पहिले नाव होते कनिका कपूर हिचे. बॉलिवूडची गायिका असलेली कनिका लंडनहून भारतात परतल्यानंतर झालेल्या टेस्टमध्ये ती कोविड पॉझिटीव्ह ठरली आणि बॉलिवूड हादरले. २० मार्चला तिला लखनौमध्ये भरती करण्यात आले होते. बराचकाळ तिच्यावर उपचार झाल्यानंतर तिला रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती आणि होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते.
किरण कुमार
कनिकानंतर बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या किरण कुमार यांना कोरोना विषाणूने गाठले. १४ मे रोजी ते रुग्णालयात तपासणीसाठी गेले असताना ते पॉझिटीव्ह आढळले. उपचारानंतर बरे होऊन ते घरी परतले.
बच्चन कुटुंब
त्यानंतर सर्वांना मोठा हादरा बसला तो अमिताभ बच्चन यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर. अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या राय बच्चन आणि आठ वर्षांची आराध्या यांनाही कोरोनाची लागण ११ जुलै रोजी झाली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात आयसोलेशन विभागात उपचार घेतले. यातून ते बरे झाले.
कार्तिक आर्यन
अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याने क्वारंटाईन राहून उपचार घेतले आणि आता तो आता बरा झाला आहे.
हेही वाचा - प्रियदर्शन जाधवलाही कोरोनाची बाधा
करीम मोरानी
'रा वन' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' सारख्या चित्रपटांचे निर्माता असलेल्या करीम मोरानी आणि त्यांची लहान मुलगी शजा मोरानी यांना कोरोनाची बाधा झाली होती.
सनी देओल
बॉलिवूड अभिनेता आणि बाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली होती. सनीला कोरोना झाल्याची बातमी हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिली होती.
अर्जुन कपूर आणि मलाइका अरोड़ा
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनाही कोरोना विषाणूने गाठले होते मलायकाने या बातमीला दुजोरा देणारे ट्विट केले होते.
कृति सेनॉन
कृति सेनॉनला अलिकडेच कोरोनाची बाधा झाली होती. ती चंडिगडमध्ये शुटिंग करीत असताना कोरोना संक्रमित झाली होती.
वरुण धवन
वरुण धवनने ७ डिसेंबरला आपण कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते.
एजाज खान
अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक असलेला बॉलिवुड अभिनेता एजाज खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कस्टडीत असलेल्या एजाज खानची चौकशी सुरू असताना त्याला कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अभिनेता कार्तिक आर्यननंतर आता सुपरस्टार आमिर खानची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्याने आता स्वतःला क्वारंटाईन केले आहे.
आमिर खान
आपल्या आगामी 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटामध्ये व्यग्र असलेल्या आमिरने कोविड१९ची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. त्याने आपल्या स्टाफलाही चाचणी करण्याचे सांगितले असून आवश्यक काळजी घेण्याचेही आवाहन त्याने केले आहे. उपचार घेतल्यानंतर आमिर पुन्हा एकदा लालसिंग चढ्ढाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.
आर माधवन
अभिनेता आर माधवनची कोविड -१९ चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सोशल मीडियावर ही बातमी चाहत्यांना देताना त्याने त्याच्या गाजलेल्या 'थ्री इडियट' चित्रपटाचा मजेशीर संदर्भ दिला आहे. 'थ्री इडियट' चित्रपटाचा संदर्भ देत माधवनने लिहिलंय, ''फरहानने रँचोला फॉलो केले आणि वायरस नेहमी आमच्या मागे लागला, परंतु यावेळी त्याने अखेर आम्हाला गाठले. पण ऑल इज वेल, कोविड लवकरच बरा होईल. ही अशी जागा आहे तिथे आम्हाला राजू नको आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आभार. मी चांगल्या प्रकारे बरा होत आहे.''
अक्षय कुमार
अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याचे काल (रविवार) समोर आले होते. त्यानंतर आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजत आहे. अक्षयने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
गोविंदा
अक्षय कुमारने तो कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळवले होते. त्याच्या पाठोपाठ त्याचा ‘भागम भाग’ चा ‘पार्टनर’ गोविंदा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह झालाय. त्यापूर्वी त्यांची पत्नी सुनिता यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता त्या बऱ्या झाल्या असल्या तरी गोविंदाला कोरोनाची बाधा झाली आहे.
विकी कौशल
विकी कौशलने समाज माध्यमांवर तो कोव्हीड पॉझिटिव्ह झाला असल्याची माहिती दिली. ‘सर्व प्रकारची काळजी आणि खबरदारी घेऊनही दुर्दैवाने मला कोरोनाची लागण झालीच. कोव्हीड संदर्भातील सर्व शिष्टाचार मी पाळत असून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधही घेतो आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोव्हीड टेस्ट करून घेण्याची मी विनंती करीत आहे’, असे विकीने लिहिलंय.
भूमी पेडणेकर
अजून एक मोठी स्टार कोरोनाच्या विळख्यात सापडली ती म्हणजे भूमी पेडणेकर. ‘मी कोव्हीड पॉझिटिव्ह निघालेय. मला कोरोनाची सौम्य लक्षणं असून भीतीचे काही कारण नाही वाटत. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी औषधं घेत असून कोव्हीड संदर्भातील सर्व शिष्टाचार मी पाळत आहे. जे माझ्या संपर्कात होते त्यांनी आपली कोव्हीड टेस्ट करून घेण्याचा सल्ला मी देत आहे. मी वाफ घेत असून व्हिटॅमिन सी युक्त आहार घेत आहे, असे तिने म्हटलंय
कोरोनाची बाधा झाल्याने जगाचा निरोप घेतलेले भारतीय सेलेब्रिटी
कोरोनाचा व्हायरस दरम्यान देशभर दहशत माजवत असताना दाक्षिणात्य गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना कोरोनाने गाठले. २५ सप्टेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बराच काळ त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर ५ ऑगस्टला त्यांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण देश हळहळला.
राहत इंदौरी
बालसुब्रमण्यम यांच्या प्रमाणेच काळाने प्रख्यात शायर आणि बॉलिवूडचे गीतकार राहत इंदौरी यांचावरही घाव घातला. १० ऑगस्ट रोजी इंदौरी यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
वाजिद खान
याच काळात सगीतकार जोडी साजिद-वाजिद यांच्यातील वाजिद खान यांचे १ जून रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण ह्रदयविकार असले तरी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. वॉन्टेड, दबंग आणि एक था टायगर सारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिले होते.
हेही वाचा - कोरोना-पॉझिटिव्ह लिस्टमध्ये विकी कौशल आणि भूमी पेडणेकर पण झाले सामील!